शिवसेना ही एकच आहे आणि एकच राहणार- उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक चिन्हावर निर्णय घ्याशिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे निवडणूक आयोगाला आवाहन


मुंबई, ८ फेब्रुवारी/प्रतिनिधीः- शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी आज मातोश्रीवरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. तसेच, विरोधकांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नाही,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. तसेच, “पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नाही. लोकशाहीचे रक्षण करावे ही निवडणूक आयोगाला विनंती आहे.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिंदे गटाने ‘लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष’ हा दावा हास्यास्पद आहे. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपतीदेखील पंतप्रधान होतील.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, “अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते, मग आमचे चिन्ह का गोठवले?” असा सवालदेखील त्यांनी केला. “शिंदे गटाचे १६ सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे. कारण पक्षांतर्गत घटनेचे पालन आम्ही पूर्ण केले आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ” शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटाने शिवसेनेवर दावा सांगितला, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितलेले आहे. विभाग प्रमुख हे पद शहरापुरते मर्यादित आहे. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय आधी होणे महत्त्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचे काम केले जात आहे. हे आरोग्यदायी लोकशाहीचे लक्षण नाही. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही केली असूनही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतला गेला.” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.