परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित- जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती

परभणी,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-   ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी, तसेच प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. तसेच एक नायब तहसीलदार व एक लिपीक हे या कक्षाचे काम पाहतील. सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री  यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी या कक्षामध्ये स्वीकारले जातील. जिल्ह्यातील जनतेला आपले अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे सादर करता येतील. अर्धन्यायिक स्वरूपातील अर्ज व शासकीय कर्मचारी यांचे आस्थापना सेवेविषयी अर्ज या कक्षात स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.

१६ डिसेंबर २०२२ रोजी शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर परभणी येथे २२ डिसेंबरपासून या कक्षाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये प्राप्त १४ पैकी १० प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांनी  सांगितले.

असे असेल कामकाज

अर्ज, संदर्भ व निवेदनांवर जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित प्रकरणे (वैयक्तिक, धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने) मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव यांना सादर करण्यात येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सांगितले.