आदित्य ठाकरेंच्या महालगाव सभास्थळी जोरदार राडा: आधी दगडफेक नंतर कार अडवण्याचा प्रयत्न

गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी गोंधळ घालण्यासाठी माणसं पाठवल्याचा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप, पोलिसांवरही फोडलं खापर

दानवे म्हणाले – शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला!

वैजापूर ,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिवसंवाद यात्रेदरम्यान सभेत राडा झाला. रमाई जयंती असल्यामुळे गावात पूर्वनियोजित मिरवणूक होती. पंरतू आदित्य ठाकरे यांची सभा आणि मिरवणूक एकाच वेळी एकाच ठिकाणी असल्याने सभास्थळी स्टेजवर एका अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. डीजेचा आवाज कमी करायला लावल्याने मिरवणुकीतील कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.

महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाली. अशात बाहेर काही काळ गोंधळ बघायला मिळाला.  काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आलेय. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. यामुळे काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

आदित्य ठाकरे आज महालगाव, वैजापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा झाली. त्यावेळी त्यांच्या गाडीवर आणि सभेच्या ठिकाणी किरकोळ दगडफेक झाल्याचं समोर आलेय. महालगाव येथे शिवसंवाद यात्रेचा मेळावा होत असताना या बाजूलाच रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती. सभा सुरु असल्याने बाजूला रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेली मिरवणूक आणि डीजे थांबवण्याची विनंती पोलिसांनी भीमसैनिकांना केली. यावेळी चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने किरकोळ दगड स्टेजवर फेकले. परिसरात तणाव झाल्याचं बघता यावेळी चंद्रकांत खैरेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहताच त्यांनी स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केलं. भाषणाच्या सुरवातीलाच आदित्य यांनी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा, असं देखील म्हटले. भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला जर डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरे महालगावात पोहचल्यावर त्यांचा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आला.यावेळी ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्यांची भाषणे झाली. मात्र यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगड भिरकावला. त्यामुळे यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र खैरे यांनी आपले भाषण चालूच ठेवेले. त्यानंतर सभा संपल्यावर पुन्हा एकदा आदित्य यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पोलिसांवर याचं खापर फोडलं आहे. व्हीआयपी संरक्षण कसं असलं पाहिजे यावर पोलिसांनी लक्ष दिलं नाही, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. गद्दार आमदार रमेश बोरनारे यांनी काही जणांना दारू पाजून गोंधळ घालण्यासाठी पाठवलं होतं, असा गंभीर आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 

काय म्हणाले अंबादास दानवे?

या घटनेच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे म्हणाले, आदित्य ठाकरे त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे. त्यामुळे काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे कारस्थान केले. सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे, सरकारने सुरक्षा वाढवावी.