जलयुक्त शिवार अभियान 2.0 प्रभावीपणे राबविण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

 जिल्हा पाणलोट विकास घटक 2.0 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची बैठक

औरंगाबाद,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  जलयुक्त शिवार अभियन 2.0 राबविण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करुन जलयुक्त शिवार अभियान 2.0 प्रभावीपणी राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान 2.0 या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, सिल्लोडचे सहायक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे, विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण प्रशांत वरुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.तौर, जलसंधारण अधिकारी एन.जी.जाधव, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश शेलार, सर्व तालुका कृषी अधिकारी व दुरदृश्यप्रणालीद्वारे सर्व तहसिलदार या बैठकीस उपस्थित होते.

            जलयुक्त शिवार अभियान 2.0 या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावामध्ये मृद व जलसंधारणची कामे करण्यात येणार असून शिवारफेरी, जलसाक्षरता, लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा आणि प्रत्येक तालुकानिहाय समितीची स्थापना करण्यात आली आहे.  

            तालुका स्तरावर कृषी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता पाणी पुरवठा व जलसंपदा उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण, अशासकीय संस्थेचे पदाधिकारी जलसंधारणाचे तज्ज्ञ व्यक्ती यांचा समावेश तालुका समितीत करण्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

            सात दिवसाच्या आत समिती स्थापन करुन जलयुक्त शिवार 2.0 अभियान यांच्या कामाला सुरुवात करावी. तात्काळ कार्यवाहीसाठी गावपातळीवर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक गाव आराखडा तयार करण्याचे नियोजन करुन आर्थिक नियोजनाप्रमाणे पाणलोट घटक विचारात घ्यावा. शेती, जनावरे, घरगुती वापर यासाठी पाण्याचे नियोजन समितीने समन्वयाने नियोजन करावे. जलयुक्त शिवार 2.0 बरोबरच ‘चला जाणुया नदीला’ हा उपक्रम समन्वयाने राबवावा. असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व तहसिलदार यांना सांगितले.

            सर्व तालुक्यातील आणि गावातील प्राधान्य क्रमानुसार जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्याचे नियोजन करताना पाणी फौडेंशन, भारतीय जैन संघटना यांच्या सहकार्याबरोबर स्थानिक लोकसहभाग घेऊन गावागावात जलयुक्त शिवाराने शेतकऱ्यांना पाण्याचे, योग्य नियोजन करुन आर्थिक उत्पन्नवाढी बरोबरच भूजल पातळीत वाढ करण्यासाठी शासनाच्या कृषी, वन, जलसंधारण व ग्रामविकास या विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात प्रभावीपणे अभियान राबविण्याच्या सूचना जिल्हास्तरीय समिती सदस्यांना दिल्या.

            मशरुम लागवड आणि संवर्धन उपक्रम गंगापूर खुलताबाद आणि कन्नड या तालुक्यात राबविला जात असून यामध्ये पुरक असलेल्या पोखरा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी उपक्रम त्याच प्रमाणे ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेसह ग्रामीण भागातील जीवन्नोतीचे उपक्रमासाठी महिला बचतगट, शेतकरी बचत गट यांचा सहभाग घ्यावा. गावतपाळीवर कृषी सहायकाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजन जिल्हा स्तरावरील समितीने करण्याचे श्री. पाण्डेय यांनी सांगितले.

            जिल्हा पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा जिल्हा जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर सादर केला. या समितीत पाणलोट क्षेत्र विकासासाठी (DPR) सविस्तर प्रकल्प अहवालातील त्रुटी दूर करुन जिल्ह्यात निवड केलेल्या 66 गावात जलसंधारणाची नाला बंडिग, गॅबीयन बंधारे, सिमेंट नाला बांध  या कामाची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. जिल्ह्यातील खुलताबाद आणि वैजापूर या तालुक्यतील प्रत्येकी दोन क्लस्टर तसेच पैठण, औरंगाबाद, गंगापूर तालुक्यातील प्रकल्पावर करण्यात येणार आहे. जलसंधारणाच्या नियोजनासाठी उर्वरित गावात पाणलोट समिती स्थापन करुन संबंधित यंत्रणेला काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.पाण्डेय यांनी दिले.