संकेत कुलकर्णी खून प्रकरण: २३, २४ फेब्रुवारीला सुनावणी

औरंगाबाद,७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद शहराला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्याची अंतिम सुनावणी आता २३, २४ फेब्रुवारीला होणार आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे बाजू मांडणार आहेत. 

पाथरी (जि. परभणी) येथील मुळ रहिवाशी व १२ वीत शिक्षण घेत असलेल्या संकेत संजय कुलकर्णी या महाविद्यालयीन युवकाची २३ मार्च २०१८ रोजी कामगार चौकाच्या जवळ भर रस्त्यात दुपारी त्याच्या अंगावर पाच ते सहा वेळा कार घालून कारखाली चिरडून त्याचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी प्रमुख आरोपी संकेत जायभाये व त्याचे साथीदार संकेत मचे, विजय जोक, उमर पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून प्रत्यक्षदर्शीचे जवाब नोंदवले होते. शासनाने या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. त्‍यांना अॅड. सिध्‍दार्थ वाघ हे सहकार्य करित आहेत. यात आता पर्यंत फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सह वीस पेक्षा अधिक साक्षीदार तपासण्यात आले आहेत.