कोणतीही करवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प

विकासकामांसाठी २७ हजार कोटींची तरतूद

मुंबई ,​४​ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :-  मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला. तब्बल ३७ वर्षांनी प्रशासकांच्या माध्यमातून महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला आहे. या अर्थसंकल्पात नवीन करवाढीची कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, सध्याच्या महसुली स्रोतांमधून महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

सुमारे ६५.३३ कोटी रुपये शिलकीचा ५२६१९.०७ कोटींच्या या अर्थसंकल्पात चालू विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी २७ हजार २४७ कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाला ८०० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्ताविले आहे.

मुंबई महापालिकेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक झाली आहे. त्यामुळे तब्बल ३७ वर्षांनी प्रशासक म्हणून इक्बाल सिंह चहल यांना प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला. एप्रिल १९८४ मध्ये द. म. सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५ मध्ये जे. जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी चहल यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प जाहीर केला.

यामध्ये प्रारंभी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे या शिक्षण खात्याचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक चहल यांना सादर केला. अर्थसंकल्पाचे आकारमान मागील वर्षाच्या तुलनेत १४.५२ टक्क्यांनी जास्त आहे. मागील अर्थसंकल्पात ४५९४९.२१ कोटी रुपये होते, तर यावर्षी ५२,६१९.०७ कोटी रुपये एवढे आहे. हा अर्थसंकल्प आनंदमय असल्याचे महापालिका प्रशासकांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प

२०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये १२८७.४१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८०.१९ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

नागरिकांना परवडणाऱ्या दरांमध्ये अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याबरोबरच, के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एमआरआय मशिन उभारण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे.

स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात १.४० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ३५ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

असंसर्गजन्य रोग कक्षासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता सदर उपक्रमासाठी १२ कोटी इतकी तरतूद केली आहे.

शिव योग केंद्रांसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये महसूली खर्चाकरिता ५ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे.

महानगरपालिकेकडून  शिक्षण विभागाचा ३,३४७.१३ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. मागील वर्षी ३,३७०.२४ कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर करण्यात आला होता.

image.png

यावर्षी खगोलशास्त्रीय प्रयोगशाळासाठी 60 लाखांची तरतूद तर ऑलिम्पियाड परीक्षांसाठी 38 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

आधुनिक शिक्षण पद्धतीसाठी शिक्षण विभागाच्या अर्थ संकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.

व्हर्च्युल क्लासरूमसाठी 3.20 कोटी, ई वाचनालयासाठी 10 लाख तर डिजिटल क्लासरूमसाठी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका शाळांतील प्रशिक्षणे आणि उपक्रमांना ही महत्त्व देण्यात आले असून रस्ता सुरक्षा दल, शाळाबाह्य मोहीम, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यासाठी एकूण 28 लाखांची तरतूद करण्यात आली आहे

2022 ते 2025 कालावधीत शाळा इमारतींची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींची तरतूद

याशिवाय पालिका शाळांमध्ये असणाऱ्या संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी एकूण 10.32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर, अधिक क्षमतेने, वेगाने वापरण्यास मिळणार आहे

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना व उपक्रम 2023- 24 मध्ये ही सुरू राहणार असून यामध्ये गणवेश पुरवठा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना, उपस्थिती भत्ता योजना, शालांत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य, शालेय आरोग्य कार्यक्रम, अत्याधुनिक बैठक व्यवस्था अशा उपक्रमांचा समावेश आहे

आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये पालिका शिक्षण विभागाकडून अनेक नवीन प्रकल्प आणि योजना ही हाती घेण्यात आल्या आहेत

नवीन आर्थिक वर्षातील नवीन प्रकल्प म्हणजे कौशल्य विकास प्रशिक्षण असणार आहे. यासाठी 28 . 45 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. निवडक शाळांतील मुलांना त्यांच्या आवडीचे प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण मंडळाकडून परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती ही विभागाकडून करण्यात येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी करण्यात येणार असून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पालिका शाळांतील सुरक्षा वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.