सर्वसामन्यांचे उत्पन्न घटले:करमर्यादा वाढवून फायदा काय?-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा सवाल

मोदी सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला

सर्वसामान्य नागरिकांची निराशा आणि दिशाभूल करणारा अर्थसंकल्प-डॅा. जितेंद्र देहाडे

औरंगाबाद,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  यापूर्वीचा अर्थसंकल्प ज्या राज्यात निवडणूका तिथे जास्त निधी दिला होता, त्यामध्ये कामे केलीच नाही. आता दोन वर्षांपासून सर्वसामन्यांचे उत्पन्न घटले, ते वाढवणे गरजेचे आहे. मग ५ लाखावरून ७ लाख करमर्यादा वाढवून उपयोग काय? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे. शेतकरीविरोधी व  भांडवलदारधार्जिणे केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्यावर अन्याय केला आहे. २. ४० लाख कोटी रुपयांचा खर्च रेल्वे करतील, महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रकल्पाकडे कानाडोळा केला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाच्या पदरी पुन्हा निराशा पडली असून केंद्रीय अर्थसंकल्प दिशाहीन असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

कोट्यवधी रुपयांची आकडेमोड बंद करणे गरजेचे आहे. आता बेरोजगारी, महागाई आणि उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न करा, कर्ज काढून व कर्जपुरवठा करून केंद्राच्या संस्था मोडकळीस आल्या, त्या वाचवा, असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांची निराशा आणि दिशाभूल करणारा अर्थसंकल्प-डॅा. जितेंद्र देहाडे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत जो अर्थसंकल्प सादर केला आहे तो सर्वसामान्य नागरिकांची निराशा आणि दिशाभूल करणारा आहे. मुंबईतून देशाला सर्वाधिक कर जात असतानाही महाराष्ट्राला काहीही भरीव तरतूद झालेली दिसत नाही. येणाऱ्या निवडणुका समोर ठेऊन हा अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तो सपशेल फेल झालेला आहे.

 

मोदी सरकारने पूर्वीप्रमाणेच काही लोकांच्या हिताला प्राधान्य देत हा अर्थसंकल्प मांडला असून महागाई वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यापेक्षा ती यातून वाढणार आहे. जीएसटी सवलतीबाबतही या अर्थसंकल्पात काहीही उल्लेख नाही. 

ग्रामीण अर्थव्यवस्थेला या अर्थसंकल्पात स्थान दिलेले दिसत नाही. विशेषतः मोदी सरकार प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देणार होते त्याचा यामध्ये कोठेही उल्लेख झालेला दिसत नाही. केवळ अवास्तव आणि आकड्यांच्या घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पात झालेला दिसतो. विशिष्ट वर्गाला लाभ पोहचविणाऱ्या या अर्थसंकल्पाने सर्वसामान्य, युवक, महिला, मध्यम वर्गीय नागरिकांची निराशा केलेली आहे. 

डॅा. जितेंद्र देहाडे

सरचिटणीस 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी