देशात प्रबळ इच्छाशक्तीचे सरकार – राष्ट्रपती

आपल्याला एकही गरीब नसलेला भारत घडवायचा आहे

नवी दिल्ली,​३१​ जानेवारी / प्रतिनिधी:- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. मुर्मू यांचे आगमन होताच संपूर्ण सभागृहाने त्यांचे टेबल वाजवून स्वागत केले.

त्या पुढे म्हणाल्या की, संसदेच्या या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाने आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण करून अमृतकालमध्ये प्रवेश केला. अमृतकालचा २५ वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे.

आपल्यासमोर एक युग निर्माण करण्याची संधी आहे. यासाठी १०० टक्के कार्यक्षमतेने काम करावे लागेल. आपल्याला २०४७ पर्यंत असे राष्ट्र घडवायचे आहे, ज्यात भूतकाळाचे वैभव आणि आधुनिकतेचा प्रत्येक सुवर्ण अध्याय आहे. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे. आपल्याला हव्या असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा देशात तयार होऊ लागल्या आहेत. आज भारतात डिजिटल नेटवर्क आहे. ज्यातून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी होती, त्यातून स्वातंत्र्य मिळत आहे. आज वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी घेऊन घेतलेल्या निर्णयांसाठी देश ओळखला जात आहे. जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेतून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येत्या २५ वर्षात विकसित भारताचा आत्मविश्वास वाढवणारा हा पाया आहे.

मी देशवासियांचे आभार मानते की, त्यांनी सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडले. सरकारने राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले. सर्जिकल स्ट्राईकपासून ते दहशतवादावर कारवाई करण्यापर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत प्रत्येक वाईट प्रयत्नाचा नायनाट करण्यात आला. कलम ३७० ते तिहेरी तलाकपर्यंत निर्णायक निर्णय घेणारे सरकार ही सरकारची ओळख बनली असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी आपल्या अभिभाषणात देशातील गरिबी मिटवण्याचे लक्ष असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, “आपल्याला असा भारत घडवायचा आहे की, ज्यामध्ये गरिबी नसेल. २०४७पर्यंत आपल्याला असे राष्ट्र घडवायचे आहे, जे भूतकाळातील अभिमानाशी जोडलेले असेल. तसेच, ज्या राष्ट्रात आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असतील. याशिवाय, जो आत्मनिर्भर असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल. आपल्याला एकही गरीब नसलेला भारत घडवायचा आहे.” असे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुढे त्या म्हणाल्या की, “भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू आहे. फरारी आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी, सरकारने फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा संमत केला आहे. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा जागृत केल्या आहेत. आता मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने हे लोक नवी स्वप्ने पाहू शकतात.”

त्यानंतर त्या म्हणाल्या की, “भारताने दहशतवादाविरुद्ध उचललेल्या कठोर पावलांची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. यामुळेच आज दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताचे मत महत्त्वाचे मानले जाते.” तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोविड काळात सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा केली.

त्या म्हणाल्या की, “कोविडकाळात जगभरातील गरिबांसाठी जगणे कसे कठीण झाले होते? हे आपण पाहिले. पण, आपला देश त्या देशांपैकी एक आहे, ज्यांनी गरिबांच्या आयुष्याचे रक्षण करण्यास, कठीण परिस्थितींमध्ये मदत करण्यास प्रथम प्राधान्य दिले. देशातील एकही गरीब रिकाम्या पोटी झोपू नये, याची काळजी घेतली. विशेष म्हणजे, परिस्थिती पाहता सरकारने ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’चा विस्तार करण्याचा निर्णय घेतला, याचा मला आनंद आहे. ही आहे संवेदनशील, गरीब समर्थक सरकारची ओळख. या योजनेचे जगभरातून कौतुक होत आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर केलेले अभिभाषण

  1. संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच आपल्या देशाने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश केला आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत काळामागे हजारो वर्षांचा गौरवास्पद इतिहास आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणा आणि भारताच्या सोनेरी भविष्याचे संकल्पही याच्याशी जोडले गेले आहेत.
  2. अमृतकाळाचा हा 25 वर्षांचा कालखंड, स्वातंत्र्याच्या  सोनेरी शताब्दीचा आणि विकसित भारत घडवण्याचा कालखंड आहे. ही 25 वर्षे आपणा सर्वांसाठी, देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वर्षे आहेत. आपल्यासमोर युग घडवण्याची संधी आहे आणि यासाठी आपल्याला संपूर्ण सामर्थ्याने प्रत्येक क्षण कार्य करत सार्थकी लावायचा आहे.
    • 2047 पर्यंत आपल्याला असा भारत घडवायचा आहे, ज्यामध्ये आधुनिकतेचा प्रत्येक सोनेरी पैलू तर आहेच त्याचबरोबर गौरवास्पद इतिहासाशीही त्याची सांगड कायम आहे.
    • आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो आत्मनिर्भर आहे आणि मानवी दायित्व निभावण्यासाठीही समर्थ आहे.
    • असा भारत – ज्यामध्ये दारिद्र्य नाही आणि मध्यमवर्गही संपन्न आहे.
    • असा भारत –ज्याची युवा शक्ती आणि नारीशक्ती, समाज आणि राष्ट्राला दिशा देण्यासाठी आघाडीवर आहे, ज्यामधले  युवक  काळाच्या पुढे आहेत.  
    • असा भारत – ज्याची विविधता अधिक समृध्द आहे, ज्याची एकता अधिक भक्कम आहे.  
  3. 2047 मध्ये देश याला मूर्त रुपात  साकारेल तेव्हा या भव्य निर्मितीच्या  पायाचे  निरीक्षण आणि आकलनही  नक्कीच करेल. त्यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या या प्रारंभीच्या काळाकडे एका आगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिले जाईल. म्हणूनच अमृतकाळामधला हा कालखंड अतिशय महत्वपूर्ण ठरला आहे.
  1. माझ्या सरकारला देशातल्या जनतेने जेव्हा सेवेची पहिली संधी दिली तेव्हा ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन आम्ही सुरवात केली. काळाच्या ओघात यामध्ये ‘सबका विश्वास’ आणि ‘सबका प्रयास’ यांची भर घातली. हाच मंत्र आता विकसित भारत निर्मितीची प्रेरणा ठरला आहे. विकासाच्या या कर्तव्य पथावर वाटचाल करणाऱ्या माझ्या सरकारला काही महिन्यातच नऊ वर्षे पूर्ण होतील.  
  2. माझ्या सरकारच्या सुमारे नऊ वर्षांच्या काळात भारताच्या जनतेने अनेक सकारात्मक परिवर्तन प्रथमच अनुभवले. सर्वात मोठे परिवर्तन म्हणजे आज प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास दुणावला आहे आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे.
    • जो भारत पूर्वी आपल्या बहुतांश समस्यांच्या निराकरणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून होता, तो भारत आज जगातल्या समस्या सोडवण्यासाठीचे माध्यम ठरत आहे.
    • ज्या प्राथमिक सुविधांसाठी देशाच्या अधिकांश जनतेला अनेक दशके प्रतीक्षा करावी लागली त्या सुविधा त्यांना या वर्षांमध्ये प्राप्त झाल्या आहेत.
    • ज्या आधुनिक पायाभूत सुविधांची आपण आकांक्षा बाळगली होती त्या पायाभूत सुविधांची आता देशात निर्मिती होऊ लागली आहे.
    • भारतात आज असे नेटवर्क निर्माण झाले आहे ज्यातून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत.
    • मोठे-मोठे घोटाळे,सरकारी योजनांमधला भ्रष्टाचार यासारख्या समस्यांमधून देशाला मुक्तता हवी होती, ही मुक्तता आता देशाला मिळत आहे.
    • धोरण निष्क्रियतेच्या चर्चेतून बाहेर येऊन आज झपाट्याने विकास आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेणारा देश अशी देशाची ओळख बनू लागली आहे.  
    • म्हणूनच जगातल्या दहाव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरून आपण पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
    • हाच पाया आहे, जो येत्या 25 वर्षात विकसित भारत घडवण्याच्या आत्मविश्वासाला बळ देत आहे.

सन्मानीय सदस्यगण,

  1. भगवान बसवेश्वर यांनी म्हटले होते, कायकवे कैलास. अर्थात कर्म हीच पूजा, कर्मामध्ये शिव सामावला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करत माझे सरकार राष्ट्र निर्मितीचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर आहे.
    • आज भारतात एक स्थिर, निर्भय, निर्णायक आणि भव्य स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काम करणारे सरकार आहे.
    • आज भारतात इमानदार नागरिकांचा आदर करणारे सरकार आहे.
    • आज भारतात गरिबांच्या समस्यांवर कायस्वरूपी तोडगा काढणारे आणि त्यांच्या शाश्वत सबलीकरणासाठी काम करणारे सरकार आहे.
    • आज भारतात अभूतपूर्व वेगाने आणि प्रचंड प्रमाणात काम करणारे सरकार आहे.
    • आज भारतात नवोन्मेश आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनकल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे सरकार आहे.
    • आज भारतात महिलांसमोरच्या प्रत्येक समस्या सोडवणारे सरकार आहे.
    • आज भारतात प्रगती साधतानाच निसर्गाचीही जोपासना करणारे सरकार आहे.
    • आज भारतात वारसा जपतानाच आधुनिकतेला प्रोत्साहन देणारे सरकार आहे.
    • आज भारतात, जागतिक पटलावर आपली योग्य भूमिका घेऊन आत्मविश्वासाने वावरणारे सरकार आहे.

सन्मानीय सदस्यगण,

  1. देशातल्या जनतेने सलग दोन वेळा एका स्थिर सरकारला कौल दिला आहे याबद्दल या सत्राच्या माध्यमातून मी जनतेचे आभार मानते. माझ्या सरकारने देशहिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, धोरणे- रणनीती मध्ये पूर्णतः परिवर्तनाची इच्छाशक्ती दर्शवली आहे. लक्ष्यभेदी हल्ला ते दहशतवादावर कठोर प्रहार, नियंत्रण रेषा ते प्रत्यक्ष ताबा रेषा या प्रती आगळीकीला चोख प्रत्युत्तर, तिहेरी तलाक किंवा कलम 370 हटवणे, एक निर्णायक सरकार अशीच माझ्या सरकारची ओळख राहिली आहे.
  2. स्थिर आणि निर्णायक सरकारचा लाभ, आपल्याला 100 वर्षातल्या सर्वात मोठ्या संकटाला तोंड देताना आणि त्यानंतरच्या परिस्थितीवर मात करताना मिळत आहे. जगभरात ज्या ठिकाणी राजकीय अस्थैर्य आहे, असे देश आज संकटाच्या खाईत सापडले आहेत. मात्र माझ्या सरकारने राष्ट्रहितासाठी जे निर्णय घेतले त्यामुळे  जगातल्या इतर देशांपेक्षा भारत खूपच चांगल्या स्थितीमध्ये आहे.

सन्माननीय सदस्यगण,

  1. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्याय यांचा सर्वात मोठा शत्रू आहे असे माझ्या सरकारचे स्पष्ट मत आहे. म्हणूनच मागील वर्षांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात अखंड लढा सुरु आहे. इमानदार व्यक्तीचा यंत्रणेमध्ये सन्मान होईल हे आम्ही सुनिश्चित केले आहे. भ्रष्टाचाऱ्याला समाजात सहानुभूती मिळू नये यासाठीची सामाजिक जाणीव देशात वाढीला लागली आहे.
  2. मागील वर्षांमध्ये भ्रष्टाचार मुक्त परीसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने बेनामी  संपत्ती कायदा अधिसूचित करण्यात आला. आर्थिक गुन्हे करून फरार झालेल्या गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यासाठी फरारी  आर्थिक गुन्हेगार कायदा संमत करण्यात आला. सरकारी कामात पक्षपात आणि भ्रष्टाचाराला थारा राहू नये यासाठी व्यवस्था प्रभावी करण्यात आली आहे. सरकारी कामात निविदा आणि खरेदी यासाठी सरकारी ई बाजार (जेम) यासारखी व्यवस्था करण्यात आली आहे, ज्याद्वारे आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाले आहेत.
  3. राष्ट्र उभारणीसाठी प्रामाणिक योगदान देणाऱ्यांचा आज विशेष सन्मान केला जात आहे. प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यामधल्या अनेक किचकट बाबी काढून देशातल्या जनतेचे जीवन सुलभ केले आहे.फेसलेस मुल्यांकनाला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आली आहे आणि व्यवस्थेला उत्तरदायी करण्यात आले आहे. पूर्वी कर परताव्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागत असे. आज प्राप्तीकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर काही दिवसातच परतावा मिळतो.वस्तू आणि सेवा कराद्वारे पारदर्शकते बरोबरच करदात्यांची प्रतिष्ठाही आज सुनिश्चित होत आहे.
  4. जनधन-आधार-मोबाईल  या त्रिसूत्रीमुळे बोगस लाभार्थी हटवण्यापासून ते एक देश एक रेशनकार्ड पर्यंत एक फार मोठी चिरस्वरूपी सुधारणा आम्ही केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या रूपातून,डिजिटल इंडियाच्या रूपाने देशाने एक कायमस्वरूपी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण केली आहे. आज 300 पेक्षा जास्त योजनांचा पैसा लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा होत आहे. आतापर्यंत संपूर्ण पारदर्शकतेतून 27 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. अशा योजना आणि अशा व्यवस्थेमुळेच कोरोना काळात भारताला कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्यापासून वाचवता आले आहेत, असे जागतिक बँकेचा अहवाल सांगतो.
  5. भ्रष्टाचाराला आळा आणि कराच्या पै आणि पैचा सदुपयोग होतो तेव्हा प्रत्येक करदात्यालाही अभिमान वाटतो.

सन्माननीय सदस्य गण,

  1. सरकारांनी शॉर्टकटच्या राजकारणापासून दूर राहावे असे आज देशाच्या इमानदार करदात्याला वाटते. समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या, जन सामान्यांचे सबलीकरण करणाऱ्या योजना असाव्यात. यासाठी माझ्या सरकारने सध्याच्या समस्यांचे निराकरण करण्याबरोबरच देशातल्या जनतेच्या दीर्घकालीन सबलीकरणावर भर दिला आहे.
  2. ’गरिबी हटाओ’ही आता केवळ घोषणा राहिली नाही. गरीबांपुढच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्याबरोबरच गरिबांना सक्षम करण्यासाठी काम करण्यात येत आहे.
  3. याप्रमाणे, गरीबी हे एक मोठे कारण सततच्या आजारपणामागे असते. गंभीर आजारपणामुळे गरीब कुटुंबाचा धीर पूर्णपणे सुटतो. अनेक पिढ्या कर्जाच्या ओझ्याखाली पिचून जातात. गरीबाला या चिंतेतून मुक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत 50 कोटींपेक्षाही जास्त देशवासियांना मोफत औषधोपचाराची  सुविधी देण्यात आली. आयुष्मान भारत योजनेमुळे देशातल्या कोट्यवधी गरीबांना आहे त्यापेक्षा गरीब होण्यापासून वाचवले आहे. त्यांचे 80 हजार कोटी रूपये खर्च होण्यापासून वाचवले आहेत. आज देशभरामध्ये जवळपास 9 हजार जनौषधी केंद्रांमध्ये अतिशय कमी किंमताला औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. यामुळे गेल्या वर्षांमध्ये गरीबांचे जवळपास 20 कोटी रूपये वाचले आहेत. याचा अर्थ फक्त आयुष्मान भारत आणि जनौषधी योजनेमुळेच देशवासियांचे एक लाख कोटी रूपये वाचण्यास मदत झाली आहे.
  4. मी सामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित सर्वात महत्वाचा घटक, पाण्याचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवू इच्छिते. माझ्या सरकारने ‘हर घर जल’ पोहोचविण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ सुरू केले. याआधी सात दशकांमध्ये देशामध्ये जवळपास सव्वा तीन कोटी घरांमध्येच पाण्याच्या नळांच्या जोडण्या दिल्या गेल्या होत्या. मात्र, जल जीवन मिशन अंतर्गत या तीन वर्षांमध्ये जवळपास 11 कोटी परिवारांमध्ये नळवाहिनीव्दारे पेयजल पोहोचविण्यासाठी जोडण्या दिल्या आहेत. याचा सर्वाधिक लाभ गरीब कुटुंबाना होत आहे. त्यांच्या पाण्याच्या  प्रश्नावर कायमचा तोडगा सरकारने काढला आहे.
  5. गेल्या वर्षांमध्ये सरकारने साडे तीन कोटींपेक्षा अधिक गरीब परिवारांना पक्की घरकुले बनवून दिली आहेत. ज्यावेळी एखाद्याला घर मिळते, त्यावेळ, त्या व्यक्तीला नवीन आत्मविश्वास येतो. यामुळे त्या परिवाराचा वर्तमान तर सुधारतोच त्याच बरोबर त्या घरामध्ये वाढणा-या मुलांमध्येही एक प्रकारचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.  सरकारने शौचालय, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस अशा मूलभूत सुविधा पुरवून गरीबांना चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे देशाच्या जनतेलाही असा विश्वास वाटतो की, सरकारी योजना आणि सरकारचा  लाभ वास्तवामध्ये जमिनी स्तरापर्यंत पोहोचत आहे. आणि भारतासारख्या महाकाय देशामध्येही शंभर टक्के योजना पोहोचवणे शक्य आहे,हे दाखवून दिले आहे.
  6. आपल्या ग्रंथांमध्ये म्हटले आहे की, – अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् !याचा अर्थ असा आहे की, ही गोष्ट आपली आहे, ही दुस-याची आहे, अशी विचारसरणी योग्य नसते. माझ्या सरकारने कोणत्याही भेदभावाशिवाय, प्रत्येक वर्गासाठी काम केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या सरकारच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत असून अनेक पायाभूत सुविधा आज तर शंभर टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचल्या आहेत. तर काही योजना हे लक्ष्य गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत.
  7. माझ्या सरकारकडून  प्रत्येक योजनेमध्ये शंभरटक्के ‘सॅच्युरेशन’च्या बरोबरच अंत्योदयाविषयी संपूर्ण निष्ठेने काम केले जात आहे. आमचे प्रयत्न आहेत की, योजनांचा लाभ योग्य आणि सर्व लाभार्थींना मिळावा. कोणीही सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये.

माननीय सदस्यगण,

  1.  आपण पाहिले आहे की, कोरोना काळामध्ये  जगामध्ये गरीबांना दिवस कंठणे, किती अवघड झाले होते. परंतु भारत अशा देशांपैकी एक आहे की, ज्या देशाने गरीबांचे प्राण वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. आणि प्रयत्न केला की, देशामध्ये एकाही गरीब व्यक्तीला उपाशीपोटी झोपावे लागणार नाही. मला आनंद वाटतो की, माझ्या सरकारने पीएम गरीब कल्याण अन्न योजनेला नवीन परिस्थितीनुसार  यापुढेही सुरू निर्णय घेतला आहे. यावरून हे एक संवेदनशील आणि गरीब-हितैषी सरकार असल्याची ओळख पटते. पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत अन्नधान्य पुरविण्यासाठी सरकारने जवळपास साडे तीन लाख कोटी रूपये खर्च केले आहेत. आज या योजनेचे संपूर्ण विश्वामध्ये कौतुक होत आहे. या प्रशंसेचे आणखी एक कारण म्हणजे, तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली पारदर्शक व्यवस्थेमध्ये अन्नधान्य पूर्णपणे लाभार्थीपर्यंत पोहोचले जात आहे.

माननीय सदस्यगण,

  1. आपल्या देशामध्ये असे अनेक वर्ग तसेच क्षेत्र आहेत, त्यांच्या आशा- आकांक्षा आणि आवश्यकता, यांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष देवूनच समग्र विकासाची योजना पूर्ण केली जावू शकते. आता माझे सरकार अशा प्रत्येक वंचित वर्गाकडे आणि वंचित क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष देवून काम करत आहे.
  2. माझ्या सरकारने त्या प्रत्येक समाजाची इच्छा पूर्ण केली आहे. हे समाज अनेक युगांपासून वंचित होते. गरीब, दलित, मागास, आदिवासी, यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांनी स्वप्न पहावीत, इतके धाडस त्यांच्यामध्ये आणण्याचे काम सरकारने केले आहे. कोणतेही काम आणि कोणताही केलेला प्रयत्न लहान, छोटा असत नाही. उलट विकासामध्ये सर्वांना त्यांची त्यांची भूमिका असते. याच भावाने वंचित वर्ग आणि अविकसित क्षेत्रांमध्ये विकास कामांवर भर देण्यात येत आहे.
  3. पदपथावरील विक्रेते, हातगाडीचालक, असे असंख्य लोक आपला लहान व्यवसाय, खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असतात. माझ्या सरकारने विकासामध्ये या        सहका-यांच्या भूमिकेचेही कौतुक केले आहे. म्हणूनच पहिल्यांदाच अशा लहान व्यावसायिकांना बॅंकिंग व्यवस्थेशी जोडले आहे. आणि पीएम स्वनिधीच्या माध्यमातून स्वस्त व्याजदरामध्ये आणि विनाहमी कर्ज देण्याची व्यवस्था केली. या योजने अंतर्गत जवळपास 40 लाख सहकारी मंडळींना कर्ज देण्यात आले आहे.
  4. माझ्या सरकारचे प्राधान्य  देशातल्या 11 कोटी लहान शेतकरी बांधव हेही आहेत. या लहान शेतक-यांची  दशकांपासून सरकारकडून वंचना केली जात होती. आता त्यांना सशक्त आणि समृद्ध बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत या लहान शेतकरी बांधवांना सव्वा दोन लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत करण्यात आली आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, या लाभार्थींमध्ये जवळपास तीन कोटी महिला लाभार्थी आहे. यामुळे आत्तापर्यंत जवळपास 54 हजार कोटी रूपये महिला शेतकरी भगिनींना मिळाले आहेत. याचप्रमाणे लहान शेतक-यांना पिक विमा, मृदा आरोग्य पत्रिका, किसान क्रेडिट कार्ड -केसीसी, यांचे कवच वाढविण्याबरोबरच आपल्या सरकारने पहिल्यांदाच पशुपालक आणि मासेमारी करणा-यांनाही किसान क्रेडिट कार्डची सुविधेशी जोडले आहे. शेतकरी बांधवांचे सामथ्र्य वाढविण्यासाठी एफ.पी.ओ म्हणजेच कृषी उत्पादन संघटना स्थापण्यापासून ते एम.एस.पी. म्हणजे किमान समर्थन मूल्यांमध्ये वृद्धी करण्यात आली आहे. माझे सरकार, लहान शेतक-यांबरोबर मजबुतीने उभे आहे.

मननीय सदस्यगण,

  1. माझ्या सरकारने अनुसूचित जाती आणि आदिवासी आणि इतर मागासा वर्गाच्या आकांक्षांना जागृत केले आहे. हा तोच वर्ग आहे, जो विकासाच्या लाभापासून सर्वाधिक वंचित राहिला होता. आता ज्यावेळी मूलभूत सुविधा या वर्गापर्यंत पोहोचविल्या जात आहेत, त्यावेळी हे लोक नवीन स्वप्ने पाहण्यासाठी सक्षम होत आहेत. अनुसूचित जातीच्या सामाजिक- आर्थिक सशक्तीकरणासाठी डॉक्टर आंबेडकर उत्सव धाम, अमृत जलधारा आणि युवा उद्यमी यासारख्या योजना आणि कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी गौरवासाठी तर माझ्या सरकारनये अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत. पहिल्यांदाच देशाने भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जनजातीय गौरव दिवसाच्या रूपामध्ये साजरा करण्यास प्रारंभ केला. अलिकडेच मानगढ धाममध्ये सरकारने आदिवासी क्रांतिवीरांना पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर श्रद्धांजली अर्पण केली. आज 36 हजारांपेक्षा जास्त  आदिवासींचे प्राबल्य असलेल्या गावांना प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम योजने अंतर्गत विकसित केले जात आहे. आज देशामध्ये 400 पेक्षा अधिक एकलव्य मॉडेल स्कूल आदिवासी क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात  आल्या आहेत. देशभरामध्ये तीन हजारांपेक्षा अधिक वनधन विकास केंद्रे ही उत्पन्नाचे नवे साधन बनली  आहेत.  माझ्या सरकारने राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनेनुसार दर्जा देवून ओबीसींच्या कल्याणासाठी असलेली आपली कटिबद्धता स्पष्ट केली आहे. बंजारा, फिरस्त्या, अर्ध-फिरस्त्या, समाजासाठीही पहिल्यांदाच कल्याण आणि विकास मंडळाची स्थापना केली आहे.

माननीय सदस्यगण,

  1. देशांमध्ये 100 पेक्षा अधिक जिल्हे असे होते की,  विकासाच्या  मानकांचा विचार करता ते खूप मागे राहिले होते. सरकारने या जिल्ह्यांना  आकांक्षित असे घोषित करून, त्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. आज हे जिल्हे देशातल्या इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने पुढे जात आहेत. आकांक्षी जिल्ह्यांना मिळणारे यश पाहून आता माझे सरकार ब्लॉक स्तरावर  हीच कार्यपद्धती वापरत आहे. आणि यासाठी देशामध्ये 500 ब्लॉक्स आकांक्षित असल्याचे चिह्नीत करून त्यांच्या विकासाचे कार्य सुरू केले आहे. या आकांक्षित ब्लॉक्सना, सामाजिक न्यायानुसार संस्थागत व्यवस्थेमध्ये विकसित केले जात आहे.
  2. देशाच्या आदिवासी क्षेत्रांमध्ये, पर्वतीय भागामध्ये, सागरी क्षेत्रांमध्ये आणि सीमावर्ती भागामध्ये गेल्या दशकांमध्ये विकासाचा मर्यादितच लाभ मिळू शकला होता. ईशान्य आणि जम्मू काश्मीर मध्ये तर दुर्गम परिस्थितीबरोबरच अशांतता आणि दहशतवाद यांचेही खूप मोठे  आव्हान होते. माझ्या सरकारने या भागात कायम शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक यशस्वी पावले उचलली आणि भौगोलिक आव्हानांनाही तोंड दिले. याचा परिणाम म्हणजे ईशान्य आणि आपल्या सीमावर्ती क्षेत्रामध्ये, विकास कामे नव्या गतीने केली जात असल्याचा अनुभव येत आहे.
  3. सीमावर्ती गावांपर्यंत अधिक चांगल्या सुविधा पोहोचविण्यासाठी माझ्या सरकाने ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’चे काम सुरू केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही सीमावर्ती क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व पायाभूत सुविधा गेल्या काही वर्षांत तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये विकासाला गती मिळत आहे. गेल्या काही दशकांपासून राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूप मोठा धोका बनलेल्या डाव्या विचार सरणीच्या  दहशतवादी कारवाया आता काही जिल्ह्यांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.

माननीय सदस्यगण,

  1. माझ्या सरकारचे एक खूप मोठे यश म्हणजे, महिला सशक्तीकरणाचे काम आहे. या संदर्भामध्ये मला ‘नारी-शक्ती’ या शीर्षकाच्या एका प्रेरणादायी कवितेचे येथे स्मरण होत आहे. भारतीय साहित्यातील अजरामर व्यक्तित्व, स्वातंत्र्य सेनानी तसेच उडिया भाषेतील सुप्रसिद्ध कवयित्री- ‘उत्कल भारती’ म्हणजेच कुंतला कुमारी साबत यांनी लिहिली होती. आजपासून जवळपास 100 वर्षांपूर्वी त्यांनी नारी शक्तीचा उद्घोष  केला होता -‘’बसुंधरा-तले भारत-रमणी नुहे हीन नुहे दीनअमर कीरति कोटि युगे केभें जगतुं नोहिब लीन।‘’याचा अर्थ असा आहे की, भारतातील स्त्री पृथ्वीवर कशाच्याही तुलनेमध्ये हीन नाही की दीन नाही. संपूर्ण जगामध्ये या नारीची अमर कीर्ती युगांयुगांपर्यंत कधीच लुप्त होणार नाही. म्हणजेच सदैव तिला दिगंत कीर्ती मिळत राहील.
  2. आज मला हे पाहून अभिमान वाटतो की, आमच्या भगिती आणि कन्या उत्कल भारतीच्या स्वप्नांप्रमाणे विश्व स्तरावर आपली र्कीतीचा ध्वज फडकवत आहेत. मला आनंद वाटतो की, महिलांच्या या प्रगतीमागे माझ्या सरकारच्या प्रयत्नांचे पाठबळ मिळत आहे.
  3. माझ्या सरकारच्यावतीने जितक्या कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत, त्यांच्या केंद्रस्थानी महिलांचे जीवन अधिक सुकर कसे होईल, याचा विचार केला आहे. महिलांना रोजगार- स्वरोजगाराच्या नवीन संधी देणे आणि महिला सशक्तीकरणाचे काम केले जात आहे. महिला उत्थानामध्ये जिथे जुन्या धारणा आणि जुन्या मान्यता तोडण्याची गरज आहे, त्या करण्याचे कामही सरकार करीत आहे. यामध्ये सरकार मागे हटत नाही.
  4. ‘बेटी बचाओ, बेटी पढाआ’ या अभियानाचे यश आज आपण पहात आहोत. सरकारच्या प्रयत्नांमुळे समाजामध्ये एक चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे कन्यांच्या संख्येत सातत्याने वृद्धी होत आहे. देशामध्ये पहिल्यांदा पुरूषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या अधिक झाली आहे. आणि महिलांच्या आरोग्यामध्ये आधीच्या तुलनेमध्ये सुधारणा झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान असो अथवा प्रधानमंत्री मातृवंदना योजना असो, यामध्ये माता आणि बालक अशा दोघांचेही जीवन वाचविण्यासाठी आपण यशस्वी  होत आहोत. आयुष्मान भारत योजनेचेही जवळपास 50 टक्के लाभार्थी महिला आहेत. 

माननीय सदस्य,

  1. मुलींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या करिअरपर्यंतचा प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी माझे सरकार प्रयत्नशील आहे. देशातील सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधणे असो किंवा सॅनिटरी पॅडशी संबंधित योजना असो, मुलींचे गळतीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे महिलांचा सन्मान तर वाढलाच, शिवाय त्यांना सुरक्षित वातावरणही मिळाले आहे. सुकन्या समृद्धी योजनेद्वारे, देशभरातील कोट्यवधी मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी प्रथमच बँकेत बचत खाती उघडण्यात आली आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मुलींच्या शिक्षणासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.
  2. माझ्या सरकारने हे देखील सुनिश्चित केले आहे की कोणत्याही कामात, कोणत्याही कार्यक्षेत्रात महिलांवर कोणत्याही मर्यादा असता कामा नये.  म्हणूनच खाणकामापासून ते सैन्यात आघाडीवर असलेल्या प्रत्येक क्षेत्रात महिलांची भरती खुली झाली आहे.  सैनिक शाळांपासून ते लष्करी प्रशिक्षण शाळांपर्यंत आमच्या मुली आता शिकत आहेत आणि प्रशिक्षण घेत आहेत.  माझ्या सरकारने प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांपर्यंत वाढवली आहे.
  3. मुद्रा योजनेच्या सुमारे 70 टक्के लाभार्थी महिला उद्योजकच आहेत.  एका अभ्यासानुसार, या योजनेमुळे महिलांची आर्थिक ताकद आणि सामाजिक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध घरांची नोंदणी, महिलांच्या नावावर झाल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. जन धन योजनेमुळे देशात प्रथमच बँकिंग सुविधांमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये समानता आली आहे. सध्या देशात 80 लाखांहून अधिक बचत गट कार्यरत आहेत. यात सुमारे नऊ कोटी महिलांचा सहभाग आहे. या महिला बचत गटांना शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे.
  4. आपला वारसा आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो आणि आपला विकास आपल्याला आकाशाला गवसणी घालण्याचे धैर्य देतो.  त्यामुळेच माझ्या सरकारने वारसा दृढ करण्याचा आणि विकासाला प्राधान्य देण्याचा मार्ग निवडला आहे.
  5. देशात एकीकडे आज अयोध्या धामचे निर्माण होत आहे, तर दुसरीकडे आधुनिक संसद भवनही उभारले जात आहे.
  6. एकीकडे आम्ही केदारनाथ धाम, काशी विश्वनाथ धाम आणि महाकाल महालोकचे निर्माण केले, तर दुसरीकडे आमचे सरकार प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारत आहे.
  7. एकीकडे आपण आपली तीर्थक्षेत्रे आणि ऐतिहासिक वारसा स्थळे विकसित करत आहोत, तर दुसरीकडे भारत जगातील सर्वात मोठी अवकाश शक्ती बनत आहे. भारताने पहिला खाजगी उपग्रहही प्रक्षेपित केला आहे.
  8. एकीकडे आदि शंकराचार्य, भगवान बसवेश्वर, तिरुवल्लुवर, गुरू नानक देव यांसारख्या संतांनी दाखवलेल्या मार्गावर आपण पुढे जात आहोत, तर दुसरीकडे आज भारत अत्युच्च तंत्रज्ञानाचे (हायटेक ज्ञानाचे) केंद्र बनत आहे.
  9. एकीकडे आपण काशी-तमिळ संगममच्या माध्यमातून एक भारत-श्रेष्ठ भारताची भावना बळकट करत आहोत, तर दुसरीकडे एक राष्ट्र, एक शिधापत्रिका सारखी आधुनिक व्यवस्थाही घडवत आहोत. संपूर्ण जग आज डिजिटल इंडिया आणि 5जी तंत्रज्ञानातील भारताची क्षमता मान्य करत आहे.
  10. भारत आज एकीकडे योग आणि आयुर्वेद यांसारख्या आपल्या प्राचीन पद्धती जगासमोर घेऊन जात असताना दुसरीकडे जगाचे औषधालय (फार्मसी ऑफ द वर्ल्ड) ही नवी ओळखही भक्कम करत आहे.
  11. भारत आज जिथे नैसर्गिक शेती, भरडधान्याची पारंपारिक पिके यांना प्रोत्साहन देत आहे, तिथेच नॅनो युरियासारखे आधुनिक तंत्रज्ञानही विकसित केले गेले आहे.
  12. एकीकडे आम्ही शेतीसाठी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहोत, तर दुसरीकडे ड्रोन तंत्रज्ञान आणि सौरऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करत आहोत.
  13. शहरांमध्ये स्मार्ट सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात असतानाच प्रथमच स्वामीत्व योजनेंतर्गत गावातील घरांचे ड्रोन मॅपिंग करण्यात येत आहे.
  14. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर उभारले जात असतानाच शेकडो आधुनिक वंदे भारत गाड्याही सुरू केल्या जात आहेत.
  15. एकीकडे आपल्या व्यापाराची पारंपारिक ताकद असलेले, जलमार्ग आणि बंदरे यांचेही आधुनिकीकरण केले जात आहे, तर दुसरीकडे बहुआयामी संपर्क व्यवस्था आणि दळणवळण पार्कचे जाळेही तयार होत आहे.

माननीय सदस्य,

  1. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात पंचप्राणाच्या प्रेरणेने देश पुढे जात आहे.  माझे सरकार गुलामगिरीचे  प्रत्येक चिन्ह, प्रत्येक मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
  2. जो कधी राजपथ होता तो आता कर्तव्यपथ झाला आहे!
  3. आज कर्तव्यपथावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा प्रत्येक भारतीयाला गौरवान्वित करत आहे. अंदमान निकोबारमध्येही आपण नेताजींचा आणि आझाद हिंद फौजेच्या शौर्याचा गौरव केला आहे. काही दिवसांपूर्वीच माझ्या सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर, नेताजींना समर्पित भव्य स्मारक आणि संग्रहालयाची पायाभरणीही केली आहे.
  4. अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांना भारतीय लष्कराच्या परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत.
  5. एकीकडे राष्ट्रीय युद्ध स्मारक हे राष्ट्रीय शौर्याचे प्रतीक बनले आहे, तर दुसरीकडे आपल्या नौदलालाही छत्रपती वीर शिवाजी महाराजांनी दिलेले सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे.
  6. एकीकडे भगवान बिरसा मुंडा यांच्यासह सर्व आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित संग्रहालये उभारली जात असताना, दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पंचतीर्थ उभारले जात असतानाच, सोबतीने प्रत्येक पंतप्रधानांच्या योगदानाचे चित्रण करणारे पंतप्रधान संग्रहालयही उभारण्यात आले आहे. 
  7. देशाने पहिला ‘वीर बाल दिवस’ पूर्ण अभिमानाने आणि भक्तिभावाने साजरा केला आहे. इतिहासाच्या वेदना आणि त्यांच्याशी निगडीत शिकवण जिवंत ठेवण्यासाठी माझ्या सरकारने देशात ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ सुरू केला आहे.

माननीय सदस्य,

  1. मेक इन इंडिया मोहीम आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या यशाची फळे देशाला मिळू लागली आहेत.  आज भारताची उत्पादन क्षमताही वाढत आहे आणि जगभरातून उत्पादक कंपन्या भारतात येत आहेत.
  2. आज, आम्ही भारतातच सेमीकंडक्टर चिप्सपासून ते विमानाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  अशा प्रयत्नांचा परिणाम म्हणजे भारतात बनवलेल्या वस्तूंची निर्यात सातत्याने वाढत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण मोबाईल फोन मोठ्या प्रमाणात आयात करायचो.  आज भारत हा मोबाईल फोनचा जगातील प्रमुख निर्यातदार बनला आहे.  देशात खेळण्यांची आयात 70 टक्क्यांनी घटली आहे, तर निर्यातीत 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
  3. माझ्या सरकारच्या नवीन उपक्रमांमुळे आपली संरक्षण उत्पादनांची निर्यात सहा पटीने वाढली आहे. मला अभिमान आहे की पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या रूपाने आपल्या सैन्यात दाखल झाली आहे.  आम्ही केवळ नवीन उत्पादन क्षेत्रातच प्रवेश करत नाही, तर खादी आणि ग्रामोद्योग यांसारख्या आमच्या पारंपारिक क्षेत्रातही प्रशंसनीय कार्य करत आहोत.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील खादी आणि ग्रामीण उद्योगांची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. माझ्या सरकारच्या प्रयत्नाने खादीच्या विक्रीतही चौपटीने वाढ झाली आहे.

माननीय सदस्य,

  1. माझ्या सरकारने नवोन्मेष आणि उद्योजकतेवर सातत्याने अभूतपूर्व भर दिला आहे. त्यामुळे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाची शक्ती उपयोगात आणली जात आहे. आज आपली तरुणाई आपल्या नवोन्मेषाची ताकद जगाला दाखवून देत आहे.  2015 मध्ये, जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारत 81 व्या क्रमांकावर होता. आता आपण 40 व्या स्थानावर पोहोचलो आहोत. सात वर्षांपूर्वी, जिथे भारतात फक्त काहीशे नोंदणीकृत स्टार्ट-अप होते, आज ही संख्या जवळपास ९० हजारांवर पोहोचली आहे.
  2. आजच्या युगात आपल्या सैन्याने युवाशक्तीने समृद्ध असणे, लढावू सामर्थ्याने पारंगत असणे, तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने सज्ज असणे अत्यंत आवश्यक आहे.  हे लक्षात घेऊन अग्निवीर योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील युवाशक्तीला सशस्त्र दलाच्या माध्यमातून देशसेवेची जास्तीत जास्त संधी मिळणार आहे.
  3. माझे सरकार देशातील तरुणांच्या शक्तीला खेळाच्या माध्यमातून देशाच्या सन्मानाशी जोडत आहे. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांपासून ते ऑलिम्पिक आणि पॅरा क्रीडास्पर्धांपर्यंत आपल्या खेळाडूंनी हे सिद्ध केले आहे की प्रतिभेच्याबाबतीत ते कोणाच्याही मागे नाहीत. खेलो इंडिया क्रीडास्पर्धा, खेलो इंडिया केन्द्र ते टीओपीएस (टॉप्स) योजना अशा कलागुणांना शोधण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात राबवण्यात येत आहेत.
  4. दिव्यांगांच्या कल्याणाबाबतही आमचे सरकार पूर्णपणे संवेदनशील आहे.  देशातील ‘एक सांकेतिक भाषा’ आणि सुगम्य भारत मोहिमेने दिव्यांग तरुणांना खूप मदत केली आहे.

माननीय सदस्य,

  1. गेल्या दशकात भारतातील पायाभूत सुविधांच्या उभारणीत दोन प्रमुख आव्हाने आमच्या निदर्शनास आली आहेत. पहिली बाब म्हणजे विशाल पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण होत नव्हते आणि दुसरी बाब म्हणजे विविध विभाग आणि सरकारं आपापल्या सोयीनुसार कामे करत होती. यामुळे सरकारी संसाधनांचा दुरुपयोग होत होताच, त्याबरोबरच प्रकल्पाच्या कालावधीतही वाढ होत होती आणि सर्वसामान्य नागरिकाची गैरसोय होत होती. माझ्या सरकारने पीएम गतिशक्ती बृहद आराखडा तयार करून या आव्हानांना तोंड देण्यासाठी भक्कम पावले उचलली आहेत. पीएम गतिशक्ती बृहद आराखड्याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी देखील उत्साह दाखवला आहे. यामुळे देशातील मल्टी मोडल कनेक्टिविटीचा देखील विस्तार होईल.
  2. माझे सरकार भारताला जगातील सर्वात जास्त स्पर्धात्मक लॉजिस्टिक केंद्र बनवण्यासाठी झटत आहे. यासाठी देशात गेल्या वर्षी राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण सुरू करण्यात आले. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे लॉजिस्टिक्स खर्चात कपात होईल.
  3. माझे सरकार ज्या गतीने आणि ज्या प्रमाणात काम करत आहे ते अभूतपूर्व आणि अतुलनीय आहे.
  • माझे सरकार स्थापन झाल्यावर, आवास योजनेंतर्गत भारतात गरिबांसाठी दररोज सरासरी 11,000 घरे बांधण्यात आली.
  • याच काळात भारतात दर दिवशी सरासरी 2.5 लाख लोक ब्रॉडबँडने जोडले गेले.
  • दर दिवशी 55,000 पेक्षा जास्त गॅस कनेक्शन्स देण्यात आली.
  • मुद्रा योजनेंतर्गत दर दिवशी 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जांचे वितरण करण्यात आले.
  • गेल्या आठ- नऊ वर्षात प्रत्येक महिन्यात जवळपास एका वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी झाली आहे.
  • या काळात दर दिवशी दोन महाविद्यालये उभारण्यात आली आणि प्रत्येक आठवड्यात एका विद्यापीठाची उभारणी झाली.
  • केवळ 2 वर्षात भारताने लसींच्या 220 कोटी मात्रा दिल्या आहेत.
  1. सामाजित पायाभूत सुविधांबद्दल बोलायचे झाले तर 2004 ते 2014 या काळात 145 वैदयकीय महाविद्यालये सुरू झाली, तर माझ्या सरकारच्या काळात 2014 पासून 2022 पर्यंत 260 वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत. यापूर्वीच्या काळाच्या तुलनेत देशात पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पट झाल्या आहेत. 2014 पूर्वी देशात 725 विद्यापीठे होती तर गेल्या आठ वर्षात 300 पेक्षा जास्त नवीन विद्यापीठे स्थापन झाली आहेत. या काळात 5000 पेक्षा जास्त महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत.
  2. त्याच प्रकारे भौतिक पायाभूत सुविधांमध्ये तर देशात अनेक नवे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. 2013-14 पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुमारे 3.81 लाख किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. मात्र, 2021-22 पर्यंत ग्रामीण रस्त्यांच्या या जाळ्यात 7 लाख किमीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आतापर्यंत देशातील 99 टक्क्यांपेक्षा जास्त वस्त्या रस्त्याने जोडल्या गेल्या आहेत. जागतिक बँकेसह अनेक संघटनांनी केलेल्या अभ्यासात ग्रामीण रस्त्यांचा गावातील रोजगार, कृषी, शिक्षण आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला असल्याकडे निर्देश केले आहेत.
  3. गेल्या आठ वर्षात राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यात 55 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.  लवकरच, देशातील 550 जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्हे भारतमाला प्रकल्पांतर्गत महामार्गाने जोडले जाणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या मार्गिकांच्या संख्येत 6 वरून 50 पर्यंत वाढ होणार आहे.
  4. त्याच प्रकारे देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्राचा देखील झपाट्याने विकास होत आहे. 2014 पर्यंत  देशात केवळ 74 विमानतळ होते. ही संख्या आता 147 झाली आहे. आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकाची हवाई वाहतूक बाजारपेठ बनला आहे. यामध्ये उडान योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय रेल्वे एक आधुनिक संस्था म्हणून उदयाला आली आहे आणि देशाच्या रेल्वेच्या नकाशावर अनेक संपर्करहित भाग समाविष्ट केले जात आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस च्या रुपात एक आधुनिक आणि अर्ध जलद रेल्वे गाडी भारतीय रेल्वेचा एक भाग बनली आहे. जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील दुर्गम भाग देखील रेल्वेने जोडले जात आहेत. भारतातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक रेल्वे जाळे बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.  भारतीय रेल्वे सुरक्षित करण्यासाठी आम्ही  — KAVACH —  या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार करत आहोत.

माननीय सदस्य,

  1. प्रगती आणि निसर्ग परस्परविरोधी असल्याच्या दृष्टीकोनात देखील भारताने बदल केला आहे. माझ्या सरकारने हरित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि ते  संपूर्ण जगाला मिशन लाईफ(LiFE)ने जोडण्यावर भर देत आहे. गेल्या आठ वर्षात सरकारने सौरऊर्जा क्षमतेमध्ये 20 पट वाढ केली आहे. आज भारत अपारंपरिक उर्जा क्षमता असलेला चौथ्या क्रमांकाचा देश आहे. देशाने यापूर्वीच आपली 40 टक्के वीजनिर्मिती बिगर जीवाश्म इंधनापासून करण्याचे उद्दिष्ट निर्धारित लक्ष्याच्या 9 वर्षे आधीच साध्य केले आहे. या यशामुळे 2070 पर्यंत नेट झिरो बनण्याच्या संकल्पाला बळकटी मिळणार आहे. देश अतिशय वेगाने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगच्या लक्ष्याच्या दिशेने प्रगती करत आहे.
  2. सरकारने अलीकडेच मिशन हायड्रोजनलाही मान्यता दिली आहे. भारत हरित ऊर्जेच्या क्षेत्रात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणार आहे. याचा परिणाम म्हणून स्वच्छ ऊर्जेसाठी तसेच ऊर्जा सुरक्षेसाठी परदेशावरील आपले अवलंबित्व कमी होईल. देशातील शहरांमधील प्रदूषण कमी करण्याला आमचे सर्वाधिक प्राधान्य आहे. म्हणूनच इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी व्यापक प्रमाणात काम सुरू आहे. FAME योजनेंतर्गत राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये केंद्र सरकारकडून सात हजारांहून अधिक इलेक्ट्रिक बस सार्वजनिक वाहतुकीत समाविष्ट केल्या जात आहेत. गेल्या आठ वर्षांत देशातील मेट्रोचे जाळे तीनपटीने वाढले आहे. आज 27 शहरांमध्ये मेट्रो ट्रेनचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे देशभरात 100 हून अधिक नवीन जलमार्ग विकसित केले जात आहेत. या नवीन जलमार्गांमुळे देशातील वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्यास होणार आहे. 

माननीय सदस्य,

  1. आज जगाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक दशकांपूर्वी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या उपयुक्ततेवर आणि त्यांच्या प्रासंगिकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत या विभागलेल्या जगाला या ना त्या प्रकारे जोडणारा देश म्हणून भारताचा उदय झाला आहे. जागतिक पुरवठा साखळीमध्ये विश्वासार्हता बळकट करणाऱ्या देशांपैकी एक अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे. म्हणूनच आज जग मोठ्या आशेने भारताकडे पाहत आहे.
  2. या वर्षी भारत जी-20 सारख्या प्रभावी गटाचे नेतृत्व करत आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या मंत्रासह, जी-20 सदस्य देशांच्या साथीने सध्याच्या जागतिक आव्हानांवर सामूहिक उपाय शोधण्याचा भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याला  केवळ एका राजनैतिक कार्यक्रमापुरते मर्यादित ठेवण्याची माझ्या सरकारची इच्छा  नाही. उलट, संपूर्ण देशाच्या प्रयत्नांनी भारताची क्षमता आणि संस्कृती प्रदर्शित करण्याची ही संधी आहे. म्हणूनच देशभरातील डझनभर शहरांमध्ये वर्षभर जी-20 च्या बैठका होत आहेत. 

माननीय सदस्य,

  1. भारताच्या जागतिक संबंधांचा हा सर्वोत्तम कालखंड आहे. आम्ही जगातील विविध देशांसोबत आमचे सहकार्य आणि मैत्री बळकट केली आहे. एकीकडे, आम्ही यावर्षी एससीओ चे अध्यक्ष आहोत आणि दुसरीकडे, क्वाड चे सदस्य असल्याने, आम्ही हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी काम करत आहोत. 
  2. आमचे राष्ट्रीय हित सर्वोच्च स्थानी ठेवून आम्ही आमच्या भूमिकेचा विस्तार केला आहे. अफगाणिस्तानातील भूकंप असो किंवा श्रीलंकेतील संकट असो,  मानवतावादी मदत घेऊन तिथे सर्वात आधी आम्ही  पोहोचलो.
  3. भारताने जी सद्भावना निर्माण केली, त्याचा लाभ आम्हाला अफगाणिस्तान आणि युक्रेनमधील संकटांच्या काळात मिळाला. या देशात संकटात सापडलेल्या आमच्या नागरिकांना आम्ही सुखरूप मायदेशी आणले आहे. याच वेळी इतर अनेक देशांतील नागरिकांनाही  मदत करून भारताने आपल्या मानवतावादी भावनेचे दर्शन घडवले.

माननीय सदस्य,

  1. भारताने दहशतवादाबाबत घेतलेली कठोर भूमिका आज जगानेही विचारात घेतली आहे. त्यामुळे दहशतवादाविरोधातील भारताचा आवाज प्रत्येक व्यासपीठावर गांभीर्याने ऐकला जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात प्रथमच UNSC दहशतवाद प्रतिबंधक समितीची विशेष बैठक झाली. या बैठकीतही भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. माझे सरकार सायबर सुरक्षेशी संबंधित चिंता देखील  संपूर्ण जगासमोर गांभीर्याने मांडत आहे.
  2. आपण राजकीय आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून बळकट असू तेव्हाच शाश्वत शांतता निर्माण होऊ शकते यावर माझ्या सरकारचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच आम्ही आमच्या लष्करी सामर्थ्याचे आधुनिकीकरण करण्यावर सातत्याने भर देत आहोत.

माननीय सदस्य,

  1. लोकशाहीची जननी म्हणून भारताची अनंत यात्रा अनंत अभिमानाने भरलेली आहे. आम्ही लोकशाहीचा विकास आणि जोपासना मानवतेच्या मार्गाने केली आहे. हजारो वर्षांच्या वैभवशाली इतिहासाप्रमाणेच आगामी शतकांमध्येही भारताची मानवी सभ्यता देखील कधीही न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे प्रवाहित राहील..
  • भारताची लोकशाही समृद्ध, बळकट होती आणि भविष्यातही बळकट होत राहील.
  • भारताची जाणीवजागृती अमर होती आणि अमर राहील.
  • भारताचे ज्ञान-विज्ञान आणि अध्यात्म शतकानुशतके जगाला मार्गदर्शन करत आहे आणि त्याच पद्धतीने आगामी शतकातही जगाला मार्ग दाखवेल.  
  • भारताचे आदर्श आणि मूल्ये अंधःकाराने भरलेल्या गुलामगिरीच्या कालखंडातही अबाधित राहिले आहेत आणि यापुढेही अबाधित राहतील.  
  • एक देश म्हणून भारताची ओळख अमर होती आणि भविष्यातही ती अमर राहील.
  1. आपल्या लोकशाहीचे हृदय असलेल्या या संसदेत अवघड वाटणारी उद्दिष्टे ठरवून ती साध्य करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे, उद्या जे करायचे आहे ते आजच साध्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. इतर अजूनही जे करण्याचा विचार करत आहेत, ते आपण भारतीयांनी त्यांच्या आधी करून दाखवले पाहिजे. 
  2. चला आपल्या लोकशाहीला समृद्ध करताना आपण वेदामधील त्या वाक्याचा अंगिकार करूया ज्यामध्ये म्हटले आहे, “संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्”  अर्थात आपण सर्व एकमेकांसोबत पावले टाकत एकमेकांच्या अंतःकरणातील भावना जाणून घेऊया आणि आपल्या संकल्पांमध्येही एकतेचा प्रवाह राहू दे.
  3. राष्ट्र उभारणीच्या या महायज्ञात आपल्या कर्तव्यपथावर वाटचाल करताना संविधानातील प्रतिज्ञेची पूर्तता करुया.
  4. धन्यवाद!
  5. जय हिंद!
  6. जय भारत!