खडकेश्वर महादेव मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन शिवसेना – एमआयएम आमने -सामने

औरंगाबाद –

पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी काल सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे नेत अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केल्यानंतर आज मंगळवारी औरंगाबादेत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खडकेश्वर महादेव मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला , त्यामुळे शिवसेना – एमआयएम आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले होते. मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीसांच्या आवाहानानंतर जलील यांनी आजचे आंदोलन मागे घेतले. दोन दिवसांच्यानंतर पुन्हा आपण येऊ असा इशारा त्यांनी दिला. जलील येणार असतील तर आपण मंदिराच्या परिसरातच तळठोकून राहू असा प्रती इशारा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला.

इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी इशारा देत खडकेश्वर महादेव मंदिर उघडण्यासाठी आपण मंगळवारी दुपारी दोन वाजता मंदिरात जाणार आहोत असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी मंदिराच्या परिसरात येण्याची तयारी केली होती. खासदार जलील आपल्या कार्यकर्त्यांसह मंदिरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावर शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे दुपारी एक वाजेच्या सुमारास मंदिराच्या परिसरात आले, त्यांच्या बरोबर शिवसेनेचे पदाधिकारी – कार्यकर्ते होते. त्यांनी मंदिर परिसराचा ताबा घेतला. खासदार जलील आले तर त्यांना रोखू अशी भूमिका त्यांनी घेतली. मंदिराबाबत हिंदू निर्णय घेतील, जलील यांनी मंदिराकडे येऊ नये अशी भूमिका सेना नेत्यांनी घेतली. मंदिराच्या परिसरात शिवसेनेचे नेते – पदाधिकारी – कार्यकर्ते जमा झाल्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलीसांनी खैरे – दानवे यांच्याशी चर्चा सुरु केली. दुसरीकडे पोलीसांचा दुसरा फौजफाटा जलील यांच्या घरी गेला . आजचा दिवस गणेश विसर्जनाचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका, आजचे आंदोलन रद्द करा असे पोलीस अधिकारी जलील यांना सांगत होते. अखेर पोलीसांची शिष्टाई यशस्व ठरली आणि जलील यांनी खडकेश्वर मंदिरात जाण्याचा निर्णय तुर्त रद्द केला. आजचा दिवस गणेश विसर्जनाचा आहे, त्यामुळे आपण आंदोलन मागे घेत आहोत असे त्यांनी जाहीर केले, पण मंदिरे उघडण्याचा निर्णय शासनाने लगेच घेतला नाही तर दोन दिवसांच्या नंतर आपण पुन्हा हे मंदिर उघडण्यासाठी येऊ असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांना मंदिराच्या परिसरात येण्याचा अधिकार नाही. ते दोन दिवसांनी येणार असतील तर आम्ही मंदिराच्या परिसरात तळ ठोकून बसू असा इशारा दिला. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याबद्दल मुख्यमंत्री सात निर्णय घेणार आहेत, त्यामुळे घाई करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेणार असल्यामुळे आपल्यामुळेच धार्मिक स्थळे उघडली गेली असे म्हणून श्रेय लाटण्याचा जलील यांचा प्रयत्न आहे असा आरोप खैरे यांनी केला.

इम्तियाज जलील यांनी मात्र खैरे यांचा हा आरोप फेटाळून लावला. उद्या बुधवारी आपण शहागंज भागातील मस्जिदीमध्ये जाणार आहोत. मस्जिद उघडायला भाग पाडणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मंदिर उघडण्यासाठी आपण येऊ असे ते म्हणाले. धार्मिक स्थळे सर्व धर्मियांची आहेत. करोनामुळे चार – पाच महिन्यांपासून ती बंद आहेत. आता सगळेच व्यवहार सुरु होत आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळे उघडावीत अशी आमची भूमिका आहे. आजचा दिवस गणेश विसर्जनाचा असल्यामुळे आम्ही आमचे आंदोलन स्थगित करीत आहोत असे ते म्हणाले. आमचे आंदोलन कोणत्याची जाती – धर्माच्या विरोधात नव्हते असे जलील यांनी स्पष्ट केले.

मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन शिवसेना – एमआयएम आमनेसामने आलेले असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील याच मुद्यावरुन आक्रमक झाले. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते खडकेश्वर मदिराच्या परिसरात जमा झाले. त्यांनी शिवसेनेच्या विरोधात,खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. शिवसेना – एमआयएम हे दोन्ही पक्ष मंदिराच्या मुद्यावरुन स्टंट करीत आहेत. आम्ही महादावेचा दर्शन घ्यायला आलो आहोत असे दाशरथे म्हणाले. परंतु त्यांना व त्यांना कार्यकर्त्यांना पोलीसांना रोखले.

एम आय एम व शिवसेना यांनी मंदिरे उघडण्यासाठी स्टंटबाजी करू नये – जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे
आज खडकेश्र्वर येथे मंदिर उघडण्यासाठी अपघाती खासदार झालेले इम्तियाज जलील यांनी मंदिरे उघडण्याचा स्टंट करू नये व शिवसेनेने सुद्धा हा स्टंट करत आहे,ही दोघांची मिली भगत आहे,आज हिंदूंसाठी फक्त हिंदू जननायक राज साहेब ठाकरे हेच आहेत जर साहे बांचा आदेश आला तर हि मंदिरे उघडण्यासाठी मनसे सक्षम आहे.


शिवसेनेचे हिंदुत्व हे आता बोथट झालेले आहेत,ठाकरे सरकार हे कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसलेले आहे,या कारणाने ते मंदिर उघडण्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही.चंद्रकांत खैरे यांनी मुख्यंत्र्यांकडे पत्र पाठवून जी पत्रकबाजी केली आहे त्याबाबत देखील श्री चंद्रकांत खैरे यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर देखील दिलेले आहे काय असा सवाल सुहास दाशरथे यांनी उपस्थित केला.आज शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे हे सुद्धा एम आय एम च्याच मतांवर निवडून आलेले आहेत,त्यामुळे यांनी हिंदुत्वाचे प्रेम दाखवू नये आणि वेळ आली तर मंदिरे उघडण्यासाठी मनसे सक्षम आहे असे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले,
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे हे शेकडो कार्यकर्त्यांसोबत खडकेश्र्वर मंदिरात येत असताना त्यांना पोलिसांनी रोखले काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पण पोलीस आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनुचित प्रकार घडला नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *