महाविकास व वंचित बहुजन आघाडीची अद्याप चर्चाच नाही-शरद पवार

कोल्हापूर : आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेससोबत एकत्र आहोत, आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. ठाकरे गट आणि वंचित यांच्या चर्चेत आम्ही कुठेही नव्हतो. आमच्या ज्या चर्चा झाल्या त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जावे, अशी आमची मानसिकता आहे. तो प्रयत्न आम्ही सुरू ठेवणार आहोत, असे वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली महाविकास आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याचे चित्र आहे, यासंदर्भात शरद पवार यांना विचारणा करण्यात आली असता पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, त्या दोघात वाद आहे की नाही, हे मला माहिती नाही.

पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. यावर प्रश्न केला असता पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेली आहेत तो प्रश्न आता कशाला काढायचा, असे उत्तर पवारांनी दिले.

शरद पवार काय म्हणाले ?

इंडिया टुडे सी वोटरचा सर्व्हे मी देखील वाचला. त्यामध्ये साधारणत: स्पष्ट दिसतंय की, आज जो देशामध्ये सत्ताधारी पक्ष आहे त्याच्याविरुद्ध जनमत आहे. तसेच महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे ती आकडेवारी सत्ताधारी पक्षाच्या हातून सत्ता जाईल असे दिसणारी आहे. अर्थात हा सर्व्हे आहे. या एजन्सीचे यापूर्वीचे सर्व्हे आपण पाहिले 10 वर्षांपूर्वीचे, पाच वर्षांपूर्वीचे.. तर ही जी एजन्सी आहे त्यांची अचूकता बऱ्याचदा सिद्ध झाली आहे. पण मी एकदम त्याच्यावर जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असे दिसतेय.

काँग्रेसच्या जागा देशात वाढतील असे दिसत आहे. उदा. कर्नाटकचा सर्व्हे वेगळा आहे. त्याची माहिती आम्ही अधिक घेतली. त्यात आम्हाला स्वच्छ असे दिसतंय की, कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही. लोक त्या ठिकाणी परिवर्तनाला उत्सुक आहेत. असे चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल. पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याची निश्चित माहिती आमच्याकडे नाही.

विरोधकांची मोट बांधण्यासाठी सर्व एकत्र काम करत आहोत. मात्र सध्य स्थितीबाबत अद्याप काही सकारात्मक सांगण्यासारखे काही नाही. मी स्वत: अनेकांशी बोलतो आहे. अनेकांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण काही ना काही तरी स्थानिक मुद्दे आहेत. आता उदाहरणार्थ केरळमध्ये आज डाव्यांचं आणि राष्ट्रवादी व अन्य सगळे एकत्र येऊन आमचं सरकार तिथे आहे. पण आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकुल नाही. या अडचणी आम्हाला सोडवाव्या लागतील. सुदैवाने दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होईल. सगळेच लोक भेटतील आणि त्यामुळे हा संवाद सुरू करता येईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. यावर चर्चाच होऊ शकत नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय यावर कोण काही बोलतेय याकडे आम्ही लक्ष देत नाही. परंतु आमचा अनुभव आहे की, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनवरोध व्हाव्यात यासाठी चंद्रकांत पाटील पत्र लिहिणार आहेत. ते कोणाला पत्र लिहिणार आहेत, या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही.कोल्हापूर, पंढरपूर व नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांना आत्ताच कसे सुचलं कळत नाही.

नाशिकमध्ये कुटुंबियांनीच मुलीची केलेली हत्या ही घडलेली घटना गंभीर असून याबाबत राज्य सरकारने कायदा व सुव्यवस्थेबाबत गांभीर्याने बघण्याची गरज आहे.अलीकडे रोज अशा बातम्या वाचायला मिळतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे. याची नोंद मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे. लव्ह जिहाद आणि हिंदू जनजागर आक्रोष मोर्चे निघत आहेत या प्रकरणांमागे विशिष्ट विचारधारा काम करत आहे. या विचारधारा समाजात जातीय तेढ कशी वाढेल? याचा प्रयत्न करत आहे.

महाविकास आघाडीमधील तीन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये एकत्र असण्याबाबत स्पष्टता आहे. पुढचे निर्णय कसे घेयचे याबाबत आमचा एकमेकांशी संवाद सुरू आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल बदलणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंह राज्यपाल म्हणून येणार अशी चर्चा आम्ही देखील ऐकून आहोत. आताचे राज्यपाल यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली, ही चांगली गोष्ट आहे.

मुंब्रामध्ये नगरसेवकांना एक कोटीचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना मूळ पक्षातून फोडून अन्य ठिकाणी नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिंदे गटाकडून यासंबंधीची पावले अधिक दिसतात. निवडणूक जवळ येताच, या गोष्टी होत असतात. पण त्याची फार चिंता करायची नसते.

बीबीसीने पंतप्रधानांवर डॉक्युमेंट्री बनवली, त्यावर बंदी घातली आहे. एखाद्या फिल्मवर बंदी घालणे लोकशाहीच्या विरोधी आहे. एखाद्याला फिल्म बघायची असेल तर तो त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. अ, ब, क लोकांना ती फिल्म आवडत नसल्यामुळे तिचे प्रदर्शनच रोखायचे, हे काही ठिक नाही. हे सगळे लोकाशाहीच्या विरोधात चालले आहे.