नियम पाळून, संसर्ग टाळून, शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार

श्रीगणरायांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोरोनाचे आणि आर्थिक संकट दूर करण्याचे श्रीगणरायांना साकडे

मुंबई, दि. 1 :- अनंत चतुर्दशीनिमित्त श्रीगणरायांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर कर. सर्वांना सुखी ठेव. सर्वांना उत्तम आरोग्य दे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात सुबत्ता येऊ दे. महाराष्ट्राला आर्थिक संकटातून बाहेर काढून पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ आम्हा सर्वांना दे…” असं साकडं घातलं आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणानं, नियमांचं पालन करीत, कोरोनासंसर्ग वाढणार नाही याची काळजी घेत शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांचे आभार मानले आहेत.

अनंत चतुर्दशीनिमित्त यंदा विसर्जन मिरवणूक न काढता गणेशभक्तांनी आपापल्या घरी, सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मंडपात किंवा नेमून दिलेल्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीनं गणेशमुर्तींचं विसर्जन केलं. पुण्यात दरवर्षी तीस तास चालणारी मिरवणूक यंदा टाळण्यात आली. मानाच्या गणेशमंडळांनी यंदा तीन तासात गणेशमूर्तींचं भक्तीभावाने विसर्जन केले. गणेशभक्तांची ही कृती बुद्धीदेवतेच्या भक्तांना साजेशी होती. मुंबई, पुण्यासह राज्यातील गणेशमंडळांनी सामाजिक जाणीवेतून रक्तदान, प्लाझ्मादान, आरोग्य शिबिरांचं आयोजन करुन गणेशोत्सव साजरा केला. त्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व गणेशभक्तांचे, गणेश मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त श्री गणरायांना निरोप देत असताना श्रीगणपती बाप्पांनी पुढच्यावर्षी लवकर यावं, अन्‌ ते येतील तेव्हा महाराष्ट्र व देश कोरोनामुक्त झालेला असेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *