दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केंद्रीय मंंत्रिमंडळाची श्रद्धांजली

नवी दिल्ली, 1 सप्‍टेंबर 2020

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला आहे.

मुखर्जी यांच्या स्मरणार्थ केंद्रिय मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन राखले.मंत्रिमंडळाने यावेळी पुढील ठराव संमत केले:

“भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळ शोक व्यक्त करीत आहे.त्यांच्या निधनामुळे, देशाने एक प्रतिष्ठित नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे.भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून पद भूषविलेले प्रणव मुखर्जी हे प्रशासकीय कामकाजात अद्वितीय अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केंद्रीय परराष्ट्र, संरक्षण, वाणिज्य आणि अर्थमंत्री म्हणून काम काम पाहिले होते.11 डिसेंबर, 1935 रोजी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका छोट्या गावात मिराती येथे मुखर्जी यांचा जन्म झाला. इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवितानाच कोलकत्ता विद्यापीठतून त्यांनी कायदा विषयात पदवी घेतली. त्यांनंतर त्यांनी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि पत्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ केला. आपल्या वडिलांकडून राष्ट्रीय चळवळीची प्रेरणा घेऊन, मुखर्जी यांनी 1969 मध्ये राज्यसभेवर निवडून आल्यानंतर पूर्णवेळ जनहितार्थ काम करण्याचा निर्णय घेतला. 

मुखर्जी यांनी उद्योग, नौवहन आणि परिवहन, पोलाद उद्योग या खात्याचे उपमंत्री आणि 1973 – 75 दरम्यान अर्थ राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1982 मध्ये त्यांनी प्रथमच अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि 1980 ते 1985 पर्यंत ते राज्यसभेचे सभागृह नेते होते. 1991 ते 1996 या काळात ते योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. 1993 पासून 1995 पर्यंत अर्थमंत्री आणि 1995 ते 1996 पर्यंत परराष्ट्रमंत्री तसेच 2004 ते 2012 पर्यंत संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी 2006 ते 2009 या काळात परराष्ट्रमंत्री आणि 2009 ते 2012 या काळात लोकसभेचे नेते ही पदे भूषविली.

प्रणव मुखर्जी यांनी 2 जुलै 2012 रोजी राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारली आणि आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला. राष्ट्रपती म्हणून मुखर्जी यांनी उच्च पदाचा सन्मान वाढविला आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाबींविषयी आपल्या अभ्यासू आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे दर्शन घडविले.

विपुल प्रमाणात वाचन करणाऱ्या, मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्र उभारणीवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानाने गौरविण्यात आले आहे. त्यात 1997 मध्ये सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, 2008 मध्ये पद्म विभूषण आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार त्यांना 2019 मध्ये प्रदान करण्यात आला.मुखर्जी यांनी राष्ट्रीय जीवनावर आपली छाप सोडली आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक प्रतिष्ठित राष्ट्रीय नेता, निपुण संसद सदस्य आणि एक मोठा राजकारणी गमावला आहे.

प्रणव मुखर्जी यांनी देशाप्रति बजावलेल्या सेवांबद्दल मंत्रीमंडळ कृतज्ञता व्यक्त करते तसेच सरकार संपूर्ण देशाच्या वतीने त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांप्रति मनापासून सहवेदना व्यक्त करते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *