बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत

उस्मानाबाद,२६ जानेवारी / प्रतिनिधी :-  बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, संतोष पाटील आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभ संदेश देताना पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत म्हणाले, आपल्या देशाचं लोकशाही संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं. म्हणून आपण हा प्रजास्ताक दिन लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करतो. आजच्या दिनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना डॉ.सावंत यांनी अभिवादन केले.

आपल्या जिल्ह्यातील देवधानोरा, नंदगाव, चिलवडी या गावांनी इतिहास रचला. यात चिलवडीचे रामलिंग जाधव, देवधानोऱ्याचे महादेव बोंदर, लक्ष्मण बोंदर, उस्मानाबादचे भास्करराव नायगावकर, जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष नामदेवराव माने अशा सर्व ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आम्हाला सदैव जाणीव आहे व यापुढेही राहील, असेही यावेळी प्रा.डॉ.सावंत म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आहेत. केवळ स्वातंत्र्य मिळविणे एवढेच ध्येय समोर न ठेवता समग्र विकासाचा ध्यास त्यांनी धरला होता, तो ध्यास लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे व ती जबाबदारी आपण सर्वजण एकत्रित येऊन पूर्ण करू या.

उस्मानाबाद जिल्हा हा नेहमीच स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर राहिलेला आहे. आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर अनेक वाईट प्रथांवर मात केली पण अजूनही बालविवाह प्रथा दुर्देवाने पूर्णपणे संपलेली नाही. या प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, निम-शासकीय, खाजगी संस्था, तसेच समाजातील प्रत्येक घटकांचा सक्रीय सहभाग मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा हा पूर्णपणे बालविवाह मुक्त जिल्हा व्हावा या उद्देशाने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने बालविवाह मुक्त जिल्हा हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज आहे. तसेच जिल्ह्यातील स्त्री, पुरुष जन्म दरांतील तफावत हा चिंतेचा विषय आहे. त्याबाबतही आपण जागृत होऊन इथून पुढे स्त्री भ्रूण हत्या होणार नाही हाही प्रण घेवू या, असे आवाहनही प्रा.डॉ.सावंत यांनी यावेळी केले.

भारतीय स्वातंत्र्याचे मुल्य पाळताना संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव ठेवायला हवी. हे भान आपल्याला संविधान देते. आज ज्या दिवसाने आपल्याला हे सर्व स्वातंत्र्य बहाल केले तो वर्धापन दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, असेही प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

ध्वजारोहण कार्यक्रमाच्या नंतर पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये तायक्वांदो मध्ये महिला मधून कांस्य पदक पटकावल्याबद्दल श्रीमती अश्विनी पाउडशेटे आणि बॉक्सींगमध्ये महिला मधून कांस्य पदक पटकावल्याबद्दल सारीका शिवाजी जटाळे यांचाही यावेळी प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये बेलेश्वर विद्यालय पखरुड चा ओमराजे सुभाष चव्हाण हा 97.31 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून चौथा आणि जि.प.ताकविकी येथील साई सचिन शिंदे हा 95.30 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून सातवा आल्याबद्दल यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये शेकापूर येथील ग्रीनलँड पब्लीक स्कूल मधील सानवी कैलास गिलबिले ही 87.24 टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून दहावा आणि तुळजापूर जवाहर नवोदय विद्यालयातील स्नेहा श्याम कवडे हा 84.56 टक्के गुण मिळवून सीबीएसई बोर्डातून आठवा आल्याबद्दल यांचाही सन्मापत्र देऊन गौरव करण्यात आला.