जेईई, नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व्यवस्था उपलब्ध करून द्या-सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद- अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर तर वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी होत आहे. या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

         माजी आमदार सतीश चव्हाण यांनी आज दि.01 मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मध्य प्रदेश व छत्तीसगड सरकारने जेईई व नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी सदरील विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची व तेथून पुन्हा आणण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांबरोबर एका व्यक्तीला येण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हा प्रवास करण्यासाठी प्रवेश परीक्षेचे पत्र दाखवणे बंधनकारक आहे. आपल्या राज्यात देखील दरवर्षी जेईई व नीट परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक विद्यार्थ्यांना 100 ते 300 कि.मी प्रवास करून परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे आपण देखील सदरील विद्यार्थ्यांना मोफत बस व्यवस्था उपलपब्ध करून दिली तर विद्यार्थी व पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही असे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आपल्या राज्य सरकारने देखील या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मा.आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *