फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा आघाडी सरकारचा डाव

ठाकरे सरकारविरोधात देवेॆद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई ,२४ जानेवारी  / प्रतिनिधी :- गेल्या अडीज वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर वेळोवेळी नवनवीन केसेसे टाकता येतील याचे प्रयत्न करण्यात आले. कुठल्याही परिस्थीतीत याला अडकवा अशी जबाबदारीच तत्कालीन सीपी संजय पांडे यांच्यावर सोपण्यात आल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं त्या उद्धवजींबाबत माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. पण खुद्द उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझा एक साधा फोनही उचलला नाही. माझ्याशी साधं बोलण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही

बाळासाहेबांचा आम्ही फोटो लावतो, तुम्ही मोदींचा लावा पाहु! असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी तुम्हीच बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो लावला अन् 2014च्या निवडणूकीत निवडून आलात. त्यामुळे आधी इतिहास तपासून घ्या असा सल्लाच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. दरम्यान बाळासाहेब काही खासगी प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब महाराष्ट्राचे आहेत, अशी भावनाही फडणवीस यांनी व्यक्त केली.

रश्मी वहिनींना भेटलो आणि म्हणालो…

माझं उद्धव ठाकरेंसोबत काही वैयक्तिक वैर नाही. मी आजही त्यांच्यासोबत चहा पिऊ शकतो. परवाच एका कार्यक्रमात मला रश्मी वहिनी भेटल्या. मी त्यांना उद्धवजींना माझा नमस्कार सांगा असं म्हणालो. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.

शिंदे गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही

पुणे: शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण मतदार संघात कमळ फुलणार का? असा प्रश्न उपस्थित केले जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांना पुर्ण विराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदार संघाचे आमदार असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या जागा या त्यांच्याच राहतील असे स्पष्ट केले आहे.

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कार्यक्रमाला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत या मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप या जागांवर निवडणूक लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावेळी शिंदे गटाच्या जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान भाजपच्या लोकसभा मिशनबाबत अधिक माहिती देताना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मिशन भारतव्यापी त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यापीही असेल असे म्हटले. याचवेळी बारामती महाराष्ट्रात आहे, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्याबरोबर आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही दावा करणार नाही. शिवसेनेच्या उर्वरीत जागांबाबत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.