अल्पवयीन मुलीला पळवून नेत विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२३ जानेवारी / प्रतिनिधी :-  अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिचा बळजबरी विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली. रोहित बाबासाहेब निकाळजे (१९, रा. शिवशंकर कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, १० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी दीड वाजेच्‍या सुमारास १७ वर्षीय पीडिता ही बिस्‍कीटचा पुडा आणण्‍यासाठी घरा बाहेर गेली ती परतली  नसल्याने जवाहरनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. गुन्‍ह्याचा तपाससुरु असताना १२ डिसेंबर २०१९ रोजी नातेवाईकांनी आरोपी रोहित निकाळजे हा पीडितेला घेवून पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडितेचा जबाब घेतला. त्‍यात, पीडिता व आरोपीची बहिण एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होत्‍या. त्‍यामुळे त्‍यांची एकमेकांच्‍या घरी ये जा होती. घराच्‍यांना संशय आल्याने पीडितेने आरोपीशी बोलणे बंद केले होते. ९ डिसेंबर २०१९ रोजी टि.व्‍ही दुरुस्‍त करण्‍याचे बहाण्‍याने पीडितेने आरोपीला घरी बोलावले, ही बाब आरोपीच्‍या बहिणींना समजली. त्‍यांनी पीडितेला समजावून सांगितले. त्‍यामुळे पीडितेने आरोपीला फोन करुन त्‍याच्‍या बहिणीसमोरच घडलेला प्रकार सांगितला व घरी बोलावले. मात्र आरोपीनेच पीडितेला एका मंदीराजवळ भेटण्‍यासाठी बोलावले. त्‍यानंतर आरोपीने पीडितेला बाबापेट्रोल पंप येथून पुण्‍याला घेवून गेला. बाबा पेट्रोलपंप येथे आरोपीचा मामा सोबत होता. त्‍यानंतर आरोपी पीडितेला घेवून मुंबई-नाशिक असा फिरला. मुंबईत रेल्वेत प्रवास करताना आरोपीने बळजबरी पीडितेचे चुंबन घेतले. आरोपीने फोन चालू केल्यानंतर त्‍याला नातेवाईक व पोलिसांचे फोन आले. त्‍यानंतर दोघे औरंगाबादला आले.

या प्रकरणात तत्‍कालीन उपनिरीक्षक निरीक्षक श्रध्‍दा वायदंडे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला भादंवी कलम ३५४ अन्‍वये १ वर्षे सक्तमजरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार शेख रज्जाक यांनी काम पाहिले.