शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार; ‘शिवसेना-वंचित’ युतीची २३ जानेवारीला घोषणा

मुंबई ,२२ जानेवारी  / प्रतिनिधी :- गेले काही महिने चर्चा सुरु होती की, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची बहुजन आघाडी एकत्र येणार कि नाही? यावर आता लवकरच जाहीर घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “२३ जानेवारीला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे.” असे विधान त्यांनी केले. यावरून आता शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, “शिवसेना आणि आमच्यात युतीबाबत बोलणी झाली आहेत. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करावी, अशी आमची भूमिका आहे. आमच्या युतीबाबत ठाकरे गटाची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा सुरु आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी, असे मत उद्धव ठाकरेंचे आहे. भलेही काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला नाकारले, तरीही आम्ही त्यांना नाकारलेले नाही.” असे ते म्हणाले. तसेच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, “शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणे खूप महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्रातील होत असलेल्या घडामोडी बघता, जेवढी ताकद वाढेल तेवढं चांगले. महाराष्ट्रासाठी आवाज वाढवण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येणे महत्वाचे ठरेल.” असे सूचक विधान केले.