लव्ह जिहाद,धर्मांतरविरोधात कायदा करा; पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा

पुणे,२२ जानेवारी / प्रतिनिधी :-पुण्यामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक राजकीय पक्षासह हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये ‘धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करण्यात यावे, त्याची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस हा ‘धर्मवीर दिन’ म्हणून साजरा करावा.’ अशा सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढणार आला. या मोर्चाची सुरुवात लाल महाल येथून करण्यात आली, तर डेक्कनमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हेदेखील सहभागी झाले होते. सुमारे ११ वाजता या मोर्चाला लाल महाल येथून सुरुवात झाली. यामध्ये हजारो संख्येने लोक सहभागी झाले होते. पुणे शहरातील अनेक राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळेही या मोर्चामध्ये सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी “होय मी धर्मवीरच!”, “गो हत्या मुक्त पुणे”, “फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर दिन”, “लव जिहाद मुक्त पुणे” असे फलक घेऊन आपल्या मागण्या पोहोचवल्या.