वाल्मी संस्थेला गतवैभव प्राप्त करुन द्यावे – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालय बळकटीकरणास प्राधान्य

औरंगाबाद,दि. 31  – जल व भूमी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाल्मी या संस्थेचे  योगदान उल्लेखनीय राहीलेले आहे. त्या पार्श्वभुमीवर या संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देत ते  वृद्धीगंत करण्याच्या दृष्टीने सर्वांनी अधिक सक्रियतेने काम करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे दिले.

        पैठण रोड कांचनवाडी येथील वाल्मी मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालय येथे आयोजित मृद व जलसंधारण कार्यालय आणि वाल्मी संस्थेच्या आढावा बैठकीत जलसंधारण मंत्री श्री.गडाख यांनी संबंधितांना निर्दैशित केले.यावेळी मृद व जलसंधारण (मरा)औरंगाबादचे आयुक्त मधुकर आर्दड, अपर आयुक्त विश्वनाथ नाथ, उपायुक्त रवींद्र गोटे, (प्रशासन), अभियांत्रीक शाखा विभागप्रमुख प्रा.डॉ.अविनाश गारुडकर,विज्ञान विद्याशाखा प्रमुख प्रा.डॉ.अजय इंगळे, प्रा.डॉ. दिलीप दुरबुडे, सहाय्यक आयुक्त, मृद व जलसंधारण सुहास वाघ, प्रशासकीय अधिकारी अशोक गायकवाड, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, जलसंधारण अधिकारी अमोल राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

            जलसंधारण मंत्री श्री.गडाख यांनी वाल्मीची भूमिका जलसाक्षरता, कृषी विकास, सिंचनाचा वापर, सूक्ष्म सिंचन लाभक्षेत्रात भूजल व प्रवाही सिंचनाच्या समन्वित वापर इत्यादींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने वाल्मीमध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे आणि संशोधन उपक्रमात भरीव प्रमाणात वाढ होणे गरजेचे असल्याचे सांगूण येथील पाणी आणि माती प्रयोगशाळेबद्दल शेतक-यांमध्ये विश्वासहर्ता जास्त प्रमाणात आहे, हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त संख्येने येथील प्रयोगशाळेतून परिक्षण अहवाल शेतक-यांना उपलब्ध करुन द्यावेत. तसेच येत्या वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा विभाग निहाय तयार करुन सादर करावा.शासनस्तरावर त्याच्या अधिक प्रभावी अमंलबजावणीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. वाल्मी या संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येकाने आपले शंभर टक्के योगदान देत संस्थेच्या सादरिकरणाची गुणवत्ता वाढवावी, असे निर्दैश श्री.गडाख यांनी यावेळी दिले. तसेच संस्थेच्या विविध मागण्या, रिक्त पदांच्या भरती बाबत शासन स्तरावरुन प्रयत्न करण्याचे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.

            मृद व जलसंधारण आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून भरीव स्वरुपात काम होणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने या ठिकाणी पूरेशा प्रमाणात मनुष्यबळ इतर अनुशंगिक बाबीची उपलब्धता करुन देण्यासाठी अद्यावत प्रस्ताव सादर करावा. आयुक्तालयाच्या बळकटीकरणासाठी प्राधान्याने निर्णय घेण्यात येतील, असेही श्री. गडाख यांनी सांगितले.यावेळी प्रा.डॉ.राजेश पुराणीक यांनी वाल्मी संस्थेचे तर अमोल राठोड यांनी आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाचे सादरणीकरण करुन माहिती दिली.  

महाराष्ट्र जलसंधारण मंडळाचाही घेतला आढावा
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जलसंधारण कार्यालयात महाराष्ट्र जलसंधारण मंडळाचाही श्री. गडाख यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार अंबादास दानवे, अप्पर आयुक्त विश्वनाथ नाथ, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी वसंत गालफाडे, आदींची उपस्थिती होती. बैठकीत 0 ते 100 हेक्टर तसेच 140 हेक्टर सिंचन क्षमतेच्या विविध चालू कामांचा आणि प्रगतीपथावर असलेल्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमांतर्गत सिंचन  विविध सिंचन कामांची दुरुस्ती करण्याचे शासनाचे धोरण असून, या संदर्भात देखील आढावा घेण्यात आला. प्रारंभी अप्पर आयुक्त विश्वनाथ नाथ यांनी जलसंधारण मंडळाच्या विविध कामांबाबत पीपीटीव्दारे माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *