कुणी काहीही म्हणो, दावोसमधून राज्यात मोठी गुंतवणूक आली:शरद पवारांसमोर मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

पुणे ,२१ जानेवारी / प्रतिनिधी :-   कुणी काहीही म्हणो, दावोसमधून राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट येथील ४६व्या सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मागील आठवड्यात मकारसंक्रांत झाली असून सर्वांनी गोड गोड बोलायचे आहे. मी नुकताच दावोस येथे जाऊन आलो आणि शरद पवार अनुभवी आहेत. शरद पवारांना माहिती आहे गुंतवणूक कशाप्रकारे महत्वाची आहे. त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान नाकारता येणार नाही. त्यामुळे कोणी काही म्हणो, परंतु राज्यासाठी मोठी गुंतवणूक आलेली आहे.

कालच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दावोसमध्ये परदेशातील नव्हे तर हैदराबादेतील उद्योजकांनी गुंतवणूक केली, अशी टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे.

पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असून त्यांचे योगदान मोठे आहे. राज्याच्या हितासाठी व सर्वसामान्य लोकांना शरद पवार वेळोवेळी मार्गदर्शन करतात. मलाही शरद पवार वेळोवेळी फोन करुन वेगवेगळया गोष्टी सांगतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार गंभीर आहे. त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होते त्यामुळे ज्या भागात साखर उत्पादित होत नाही तिथे साखर व्यवस्थापन केले पाहिजे. साखर उत्पादनासोबत फळबाग उत्पादनाकडे लक्ष्य द्यावे. उस शेतीकरिता ठिबक सिंचनचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीस कमी पाणी लागून अल्प जमीनीत मोठे उत्पादन घेता येईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, साखर कारखान्यावर अनेक उद्योग अवलंबून असून सरकार याबाबत गांभीर्याने काम करते. १८ जलसिंचन प्रकल्प आम्ही मार्गी लावल्याने अडीच हजार लाख हेक्टर जमीन ओलितीखाली आली आहे. उसतोडणी मजुरांची संख्या कमतरता जाणवत असून ९०० हार्वेस्टची सध्या गरज आहे ती आम्ही पूर्ण करु. पारंपारिक शेती सोबत अत्याधुनिक शेतीतंत्र शेतकऱ्यांना वापरावे लागेल. शेतकरी हा अन्नदाता असून त्याच्या पाठीशी आतापर्यंत सर्व सरकार उभे राहिले आहे. आपलेही सरकार ही शेतकऱ्यांचे पाठीशी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एखादा व्यक्ती, संस्था चांगले काम करते आणि त्यांना पुरस्कार दिल्याने ते आगामी काळात चांगले काम करतात व बाकीचे त्यांची प्रेरणा घेतात. चांगले काम करणाऱ्यांची स्पर्धा होऊन त्याचा फायदा समाजाला होत असतो. देशाच्या व ग्रामीण भागाच्या विकासात उद्योगाचे मोठे योगदान आहे. उस उत्पादनापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत संशोधन काम वसंतदादा शुगर इन्सिट्युट संस्था करते. जालन्यामध्ये विविध बियाणे निर्माण केल्याने त्याचा फायदा मराठवाड्यास होत आहे.