वीरप्पन गॅंगचा कोरोना काळात मोठा घोटाळा:संदीप देशपांडे आणणार ‘हा’ मोठा घोटाळा समोर

महापालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे संदीप देशपांडेंच्या हाती

मुंबई : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आणि पेन ड्राईव्ह हाती आल्याचे व हे सगळे सोमवारी जाहीर करणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत केले आहे.

आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह ठेवून गेल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही यामध्ये असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

कशा पद्धतीने मुंबईची लूट करण्यात आली हे मी उघड करणार आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीकडे करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

याचबरोबर संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे वीरप्पन गॅंगच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला संदिप देशपांडे यांनी लगावला आहे. वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा पुराव्यासहीत सोमवारी दिनांक २३ जानेवारीला उघड करणार असल्याचे देशपांडेंनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने सभा, बैठकांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. 23 जानेवारीला कोरोना काळातील सर्वात मोठा घोटाळा उघड होईल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

भाजपनेही मुंबई पालिकेच्या कारभारावर आक्षेप घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात मोठे आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याचवेळी 23 जानेवारी रोजी संदीप देशपांडे कोणता घोटाळा पुढे आणतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.