वाङ्मय, राजकारण, समाजजीवनातून सौजन्यशील निर्लेपपण हरवले-न्या. नरेंद्र चपळगावकर यांची खंत

औरंगाबाद,२१ जानेवारी / प्रतिनिधी :-  ज्येष्ठ साहित्यिक काकासाहेब गाडगीळ हे सौजन्यशील, निर्लेप असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या वक्तृत्व शैलीचा आपल्यावर मोठा प्रभाव असून, काकासाहेबांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आपल्याला पुढच्या आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन करत राहील, अशा भावना वर्धा येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केल्या. आज मात्र, वाङ्मय, राजकारण आणि समाजजीवनात जे सौजन्य, निर्लेपपण लागते ते आपण हरवून बसलो आहोत, अशी खंतही त्यांनी मांडली.

पुणे येथील काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने संमेलनाध्यक्षांना देण्यात येणारा पुरस्कार शनिवारी न्या. चपळगावकर यांना येथे प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व २१ हजार रुपये रोख, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, ज्येष्ठ समीक्षक प्रा. डाॅ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, अनंत बागाईतकर, प्रा. डाॅ. जयदेव डोळे, ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर ,नंदिनी चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्या. चपळगावकर म्हणाले, लोकहितासाठी लालफितीचे नियम बाजूला ठेवून काकासाहेबांनी अनेक महत्त्वाची कामे केली. काकासाहेबांचे राजकीय क्षेत्रातील ऋण स्मरणात ठेवले पाहिजे. काकासाहेब एकमेव राजकारणी आहेत ज्यांना सत्ता चिकटली नाही. राज्यपालपदाचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते बसच्या रांगेत उभे राहून तिकीट घ्यायचे. काकासाहेबांची आठवण साहित्य संस्थांनीही ठेवली पाहिजे. पुण्यातील साहित्य परिषदेने जे अतिथीगृह बांधले आहे, त्यामागे त्यांचेच प्रयत्न आहेत. साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांना रेल्वे तिकिटात सवलत पूर्वी जी मिळायची ती काकासाहेबांमुळे होती. दिल्लीत जाणाऱ्या सर्वांना काकासाहेब जवळचे वाटायचे. त्यांचे मिश्किल शैलीतील नर्मविनोद, ललित लेखन मराठी वाचकांना पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यायला हवे, अशी अपेक्षाही न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंतराव गाडगीळ यांनी पुरस्कारामागची भूमिका मांडली. ते म्हणाले, १९६२ साली सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काकासाहेब गाडगीळ हे निवडून आले होते. त्यांनी आयुष्यात ३६ पुस्तके लिहिली. त्यातील १२ ते १४ पुस्तके ही स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगात असताना लिहिली. १९९६ साली ३६ पुस्तकांचे २७ खंडांत रूपांतर करून तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते पुनर्प्रकाशनाचा एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. काकासाहेबांचे साहित्य अजरामर राहावे, त्यांची आठवण राहावी, या दृष्टिकोनात प्रतिष्ठानने घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक वर्षी संमेलनाध्यक्षांना काकासाहेबांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कोविड कालखंड वगळता मागील २५ ते ३० वर्षांपासून पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.