प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला आग

औरंगाबाद,२१ जानेवारी / प्रतिनिधी :-प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका खासगी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही घटना नगर नाक्यावरील केंद्रीय विद्यालयासमोर शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

हिमालया ट्रॅव्हल कंपनीची ही बस पंढरपूरच्या दिशेने इंधन भरण्यासाठी नेण्यात येत होती. बसमध्ये चालक व एक त्याचा सहकारी होता. केंद्रीय विद्यालयासमोर बसने अचानक पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी खाली उड्या घेतल्या व अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने 2 बंबातून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उप अग्निशमन केंद्र अधिकारी मोहन मुंगसे, डी. डी. साळुंके, एल. पी. कोल्हे आदींसह सहकार्‍यांनी आग आटोक्यात आणली.