शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे? सुनावणी ३० तारखेला

दोन्ही गटांना सोमवारी लेखी उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश 

नवी दिल्ली : शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी २३ जानेवारी रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लेखी उत्तर मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे.

आज ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे? या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे, त्यामुळे प्रतिनिधीसभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्या, किंवा पक्षप्रमुखपदाला मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढे केली. निवडणूक आयोगाने याबाबत अजूनतरी काहीही निर्णय दिलेला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख राहणार का? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

आजच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.

उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद कायम राहण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगात युक्तीवाद केला. प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्या, असे दोन अर्ज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात दाखल करण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षप्रमुख होण्यासाठी प्रतिनिधी सभा घ्यावी लागणार आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये पुन्हा एकदा पक्षप्रमुखपदाची निवड करण्यात येईल. याच कारणामुळे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रतिनिधी सभा घ्यायला आणि नेता निवडीला परवानगी द्यायची मागणी केली आहे. ही मागणी मान्य होत नसेल तर प्रतिनिधी सभा घ्यायला आणि पक्षप्रमुखपदाला मुदतवाढ द्या, असंही कपिल सिब्बल निवडणूक आयोगात म्हणाले.

प्रतिनिधी सभेतल्या 271 जणांपैकी 170 जण आमच्यासोबत आहेत. पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही. प्रतिनिधी सभाच पक्ष चालवतो, पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होऊ शकत नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगात केला.

शिंदे गटाकडून देण्यात आलेली शपथपत्र खोटी, या सर्वांची ओळख परेड घ्या, अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली. शिंदेना मुख्यनेतेपद कुणी दिलं? ही नियुक्ती होताना राष्ट्रीय कार्यकारिणी झाली का? राष्ट्रीय कार्यकारिणीसाठीची घटना कुठे? असे प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले.