आमच्या घराण्याला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होत असतानाच…’ ; सत्यजित तांबेंनी व्यक्त केली नाराजी

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीआधी मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. काँग्रेसने बंडखोरी केल्याबद्दल सत्यजित तांबे यांचे पक्षातून निलंबन केले. त्याआधी सुधीर तांबे यांचेदेखील निलंबन केले होते. यावर पहिल्यांदाच सत्यजित तांबे यांनी माध्यमांसमोर काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “आमच्या घराण्याला काही दिवसामध्येच काँग्रेसमध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. अशामध्ये काँग्रेस पक्षाने केलेली कारवाई ही निराशाजनक आहे.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, ‘वेळ आली कि यावर उत्तर देऊ,’ असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

सत्यजित तांबे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आमच्या कुटुंबियांवर गेल्या काही दिवसांमध्ये खूप राजकारण झाले. मी गेल्या २२ वर्षांपासून काँग्रेसचे काम करतो आहे. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष असून पक्षामध्ये अंतर्गत काही प्रक्रिया आहेत. शिस्तपालन समितीच्या काही नियमावली असून त्या सगळ्या नियमावलींची पायमल्ली केली गेली. कुठल्याही पद्धतीचा खुलासा न मागता माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “माझ्या वडिलांनी गेली १५ वर्षे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे. वडिलांच्या कामामुळे मतदार संघातील माणसे पक्ष सोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत. त्यांनी केलेले काम पुढे घेऊन जाण्यासाठीच मी यावेळी निवडणुकीत उतरलो आहे. जसे प्रेम तुम्ही वडिलांवर केले, तसेच प्रेम माझ्यावरही करावे आणि असेच माझ्या पाठीशी उभे राहावे.” असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.