मास्क, हात वारंवार धुणे, शारीरिक अंतर ठेवण्याची नागरिकांना सवय लावा – मंत्री संदिपान भूमरे

* चित्तेगाव, पिंपळवाडी कोविड केअर केंद्राला भेट

 * पात्र लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण

 * तालुक्यातील कोविड स्थितीचा घेतला आढावा

औरंगाबाद दिनांक 31: मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टसिंगची सवय नागरिकांना लावण्यासाठी सर्वांनी जनजागृती करण्यावर भर देण्याचे आवाहन रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी केले. तसेच शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवांचे संपर्क क्रमांक जाहीर करा, असे निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले. 

पैठण तहसील कार्यालयात कोरोना व उपाययोजनाबाबत आढावा बैठक श्री.भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके आदींसह सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

मंत्री श्री. भूमरे म्हणाले, कोरोना आजाराला टाळण्यासाठी सर्वांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन नागरिकांनी करावे, खासगी रुग्णालयांनी देखील या कोरोना संकट काळात रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे, रुग्णांची सेवा करावी. त्याचबरोबर जायकवाडी धरण पहिल्यांदाच 1975 पासून सलग दोन वेळेस पूर्णतः भरत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब असली तरी नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक साधनसामुग्री बाबत पडताळणी करावी, असेही यावेळी ते म्हणाले.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना ताकीद द्यावी. गर्दी होणार नाही, यासाठी नागरिकांना वारंवार सूचना द्याव्यात. पोलीस, नगर परिषद विभागांनी वाहनाद्वारे लोकांमध्ये कोरोना आजार होऊ नये यासाठी  घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करावी.  लोकांमध्ये स्वयं शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनातून नवनवीन कल्पना राबवण्यात याव्यात. कोविड केअर केंद्रांवर उत्तम दर्जाचे जेवण मिळेल, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

उपविभागीय अधिकारी श्री. मोरे यांनी पैठण तालुक्यात कोविड 19 आजार नियंत्रणासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती प्रेझेंटेशनद्वारे सादर केली. यामध्ये तालुक्यातील रुग्ण, उपचार होऊन बरे झालेले रुग्ण, कोविड केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, दंडात्मक कारवाई याबाबत माहिती सादर केली. या कार्यक्रमात कोविड योद्धा म्हणून नायब तहसीलदार दत्ताजी नेलावड यांच्या कामाचे  कौतुक मंत्री श्री.भूमरे, श्री. चव्हाण, श्री. गोंदावले यांनी पुष्गुच्छ देऊन केले. 

बैठकीपूर्वी तहसील परिसरात मंत्री श्री.भूमरे आणि जिल्हाधिकारी श्री. चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदावले यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

चित्तेगाव, पिंपळवाडी कोविड केअर केंद्राला भेट

सुरुवातीला मंत्री श्री. भूमरे, जिल्हाधिकारी श्री.चव्हाण, श्री. गोंदावले यांनी पैठण तालुक्यातील चित्तेगाव, पिंपळवाडी येथील मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन येथील रुग्णांशी संवाद साधला. तसेच देण्यात येत असलेल्या सुविधांची पाहणी केली.

 लाभार्थ्यांना कर्ज वितरण

पैठण येथे पैठण विशाल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, पैठण आणि औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पात्र लाभार्थ्यांना मंत्री श्री. भूमरे, जिल्हाधिकारी श्री. चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वितरण करण्यात आले.  यावेळी शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात लाभ झाला आहे, शासनाच्या या कर्जमुक्तीच्या निर्णयातून शासन कायम शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट होते, असेही मंत्री श्री. भूमरे यावेळी म्हणाले. यावेळी सोयासायटीच्यावतीने मान्यवरांचा सत्कारदेखील करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *