जळगाव महामार्ग ३० जानेवारीपर्यंत वाहतूक योग्य करण्याची हमी

औरंगाबाद जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांची खंडपीठापुढे माहिती

औरंगाबाद,१९ जानेवारी / प्रतिनिधी :-औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील अडथळे दूर करून हा महामार्ग येत्या ३० जानेवारीपर्यंत वाहतूकयोग्य करू, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व महामार्ग प्राधिकरणचे संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संतोष देशमुख यांच्यापुढे प्रत्यक्ष हजर राहून दिली.

औरंगाबादेत जी-२० परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या विदेशी प्रतिनिधींसमोर जळगाव मार्गाच्या दुर्दशेचे प्रदर्शन घडले तर काय संदेश जाईल ? प्रशासन जर परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना रखडलेल्या जळगाव मार्गावर नेण्याऐवजी हेलिकाॅप्टरने नेण्याचा विचार करत असेल तर पाहुणे हवाईमार्गाने तर सर्वसामान्य नागरिक दुर्दशा झालेल्या रस्त्याने का, असा प्रश्न खंडपीठाने ११ जानेवारी रोजीच्या सुनावणीवेळी उपस्थित केला होता. न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी याप्रकरणाशी संबंधित महामार्ग प्राधिकरणाच्या प्रमुखांनी व्यक्तीश: पुढील सुनावणीवेळी हजर राहावे, असे निर्देश दिले. तर औरंगाबाद व जळगावचे जिल्हाधिकारी उपस्थित राहू शकतील का, अशी विचारणा करून त्यांनी उपस्थित राहावे, अशी तोंडी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली होती. त्यानुसार गुरुवारी औरंगाबादचे जिल्हाधिकारी पाण्डेय व महामार्ग प्राधिकरणचे प्रमुख अधिकारी उपस्थित झाले होते. त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. जळगाव महामार्गावर सूचनांच्या दृष्टीने माहितीही फलकावर देण्यात येईल, असेही दोन्ही अधिकाऱ्यांनी खंडपीठाला सांगितले. याप्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. चैतन्य धारूरकर, महामार्गाकडून भूषण कुलकर्णी, नागरी उड्डयण प्राधिकरणाकडून ॲड. नितीन पाटील, कंत्राटदाराकडून ॲड. अभिजित धरंदले, सरकारकडून ॲड. सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले.