नगरकडे जाणारा दुपदरी मार्गापैकी एक मार्ग सुरु 

औरंगाबाद,१९ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबादहून नगरकडे जाणारा दुपदरी मार्गापैकी एक मार्ग गुरुवारी दि.१९ दुपारी तीन वाजता सुरु करण्‍यात आल्याचे निवदेन सरकारी वकिलांनी आज खंडपीठासमोर केले, तर नगरहून औरंगाबादकडे दुसरा जुना मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु करण्याचे आदेश  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्‍या. रवींद्र  घुगे आणि न्‍या. संजय देशमुख यांनी दिले. याचिकेवर पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शहरातील विविध रस्ते, पुलांच्या कामांच्या संदर्भाने ॲड. रुपेश जैस्वाल यांनी पार्टी इन पर्सन जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी गुरूवारी खंडपीठापुढे झाली. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद-नगर महामार्ग संक्रांतीला खुला करण्‍याबाबत निवेदन दिले होते. त्‍या दुपदरी महामार्गावरील एक मार्ग आज दुपारी तीन वाजता सुरु करण्‍यात आल्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. त्‍यावर खंडपीठाने दुपदरी मार्गांपैकी नगर – औरंगाबाद हा दुसरा मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु करण्‍याचे निर्देश दिले.
शिवाजीनगर भूयारी मार्गात काही खासगी मालमत्तांचे भूसंपादन बाकी आहे, त्‍या मालमत्तांचे महापालिकेने मूल्यांकन केले नसल्याचे अॅड. जैस्‍वाल यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शना आणून दिले. त्‍यावर महापालिकेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ  राजेंद्र देशमुख यांनी वेळ मागुन घेतला.  सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वे विभागाने काही जागांचे भूसंपादन बाकी असले तरी वर्क ऑर्डर इश्‍यु करुन आम्ही काम सुरु करु शकतो, असे निवेदन केले.
सुनावणीवेळी बीड बायपासवरील उड्डाणपुलाच्‍या उंचीबाबत निघालेल्या मुद्द्यावर अॅड. जैस्वाल यांनी, उड्डाणपुलाच्‍या उंचीबाबत वृत्तपत्रांमध्‍ये आलेल्या बातम्यांची कात्रणे आणि पुलाचे फोटो खंडपीठात सादर केली. त्‍यावर खंडपीठाने पुढील सुनावणीवेळी उड्डाण पुलाचे फोटो आणि त्‍याची संपूर्ण माहिती  खंडपीठात सादर करण्‍याचे निर्देश अॅड. जैस्‍वाल यांना दिले.
या प्रकरणी शासनातर्फे मुख्य सरकारी वकील ऍड. डी. आर. काळे, ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, ॲड. अदवंत, ॲड. रुपेश जैस्वाल आदींनी काम पाहिले.