औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा प्रकल्प :दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा

दावोस, १७ जानेवारी / प्रतिनिधी :- आज दुपारपर्यंत दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे ८८ हजार ४२० कोटी रुपये गुंतवणूकीचे करार झाले असून, इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरु आहे. तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात देखील चर्चा झाली.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प ( रोजगार १५ हजार) , ब्रिटनच्या वरद फेरो अॅलाँईजचा गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे १ हजार ५२० कोटींचा स्टील प्रकल्प ( रोजगार २ हजार), इस्त्रायलच्या राजूरी स्टील्स अॅण्ड अलॉईजचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ६०० कोटी रुपयांचा स्टील प्रकल्प ( रोजगार १ हजार), पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट अॅटो सिस्टीम्सचा पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे ४०० कोटी रुपयांचा प्लास्टीक ऑटोमोटीव्हज् प्रकल्प ( रोजगार २ हजार) तसेच गोगोरो इंजिनियरींग व बडवे इंजिनियरींगचा २० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा अॅटो प्रकल्प (राज्यात विविध ठिकाणी रोजगार ३० हजार) अशा काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दावोस येथे आतापर्यंत झालेल्या विविध प्रकल्पांसमवेतच्या सामंजस्य करारांनुसार, पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळेल.

महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर-हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून नागरी विकासाला चालना मिळणार आहे. तर पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार ६५० कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे महाराष्ट्रातील औषध निर्मिती क्षेत्रास चालना मिळणार आहे. यामुळे २ हजार रोजगार निर्मिती होईल.

मुंबई येथे इंडस् कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणूकीचा प्रकल्प येणार असून, यामुळे आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेंत्रांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सेवा देता येऊ शकतील. तसेच बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या सामंजस्य करार प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहतीसंदर्भात चर्चा

जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या याठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.

लक्झमबर्गचे पंतप्रधान, राजपुत्र यांची महाराष्ट्र दालनाला भेट ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा

लक्झमबर्गचे पंतप्रधान झेव्ह‍िएर बेटेल  आणि राजपुत्र गुलिएम जेन जोसेफ यांनी आज महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्यात चर्चाही झाली.

महाराष्ट्र पॅव्ह‍िलियनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे छायाचित्र व प्रदर्शन सुरु आहे, तेही त्यांनी आवर्जून पाहिले आणि झपाट्याने बदलत्या मुंबईविषयीची माहिती जाणून घेतली.

सिंगापूरचे मंत्री डेस्मंड ली यांची महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट

सिंगापूरचे मिनिस्टर ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट डेस्मंड ली यांनी आज महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती त्यांना दिली.  यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची इंडिया पॅव्हेलियनला भेट

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज संध्याकाळी दावोस येथील इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन चर्चा केली.

राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटनही करण्यात आले. या पॅव्हेलियनला भेट देऊन महाराष्ट्राविषयी जाणून घेण्यासाठी अनेक प्रतिनिधीनी गर्दी केली आहे.दावोस येथे पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे सामंजस्य करार झाल्यामुळे, महाराष्ट्रावर उद्योग व गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथे सांगितले.

महाराष्ट्रात ब्रिटनची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्र्यांची ‘दि डेली मेल’ला माहिती

महाराष्ट्रामध्ये ब्रिटनची गुंतवणूक अधिक व्हावी तसेच परस्पर सहकार्य वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये ब्रिटनच्या सर्वाधिक खपाच्या दि डेली मेलशी बोलताना सांगितले.  या प्रसंगी त्यांनी मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या पायाभूत विकासाच्या कामांविषयी विस्तृत माहिती दिली. 

मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या विषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती देऊन पुढील 2 वर्षाच्या मुंबई महानगर प्रदेशाच्या  विकास आराखड्याची माहिती दिली. 

सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री श्रीमती जोस्‍फाईन  या देखील मुख्यमंत्र्यांना भेटल्या. त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील सुविधांविषयी चर्चा केली.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनची २० हजार कोटींची गुंतवणूक,१५ हजार रोजगार निर्मिती होणार

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचा सामंजस्य करार आज दावोस येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. चंद्रपूर येथील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प अमेरिकेची न्यू एरा क्लिनटेक सोल्युशन कंपनी करणार आहे. त्यामाध्यमातून १५ हजार रोजगार निर्मिती होणार असून विदर्भाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अमेरिकेच्या न्यू एरा क्लिनटेक सोल्युशनतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे २० हजार कोटी रुपयांचा कोल गॅसीफिकेशन प्रकल्प करण्यात येणार आहे. ५ एमएमटीपीए (मिलियन मेट्रीक टन्स् पर ॲनम) क्षमतेचा हा कोल गॅसीफिकेशनचा प्रकल्प आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये कोल गॅसीफिकेशन ही काळाची गरज असून कोल गॅसीफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे सिंथेसीस गॅस निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, न्यू एरा क्लिनटेकचे भारतातील कार्कारी संचालक बाळासाहेब दराडे, गोपी लटरटे, निहीत अग्रवाल, अजय अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.