‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत प्रश्नचिन्ह कायम!शुक्रवारी होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली,१७ जानेवारी / प्रतिनिधी:- शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाकडे जाणार ? याचा निर्णय आजही होऊ शकला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी आता शुक्रवारी 20 जानेवारीला होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे गटावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सुभाष देसाई उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांच्या पाठिंब्यावर वेगळा गट स्थापन करून भाजपच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही शिवसेना आपली असल्याचा दावा केला आणि हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. 7 ऑक्टोबर दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठले होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि पक्ष चिन्हावर सुनावणी सुरू झाली.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता शिवसेना नक्की कोणाची आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज अंतिम सुनावणी पार पडली. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे कोणत्या गटाकडे जाणार हे अद्याप अधांतरीच राहिले आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी या दोन्ही गटांमध्ये चिन्हावरुन संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांसाठी तात्पुरती चिन्हं बहाल केली तसेच दोन्ही गटांना वेगळी नावंही दिली. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाचे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि चिन्ह ‘मशाल’ देण्यात आले. तर एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलावर’ हे चिन्ह देण्यात आले.

राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना पक्ष, चिन्ह यावरून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी कायदेशीर लढाई सुरू आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात खटला वारंवार प्रलंबित असताना आयोगातील कामकाज पद्धतशीरपणे सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, शिवसेनेतील फूट ही केवळ कल्पना आहे. शिवसेनेतील फूट मान्य करू नका, असे सांगत ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. शिंदे गटाच्या याचिकेत त्रुटी असून शिंदे गटाच्या बाहेर पडल्याने पक्षाच्या पदरात कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. तसेच शिंदे गटाचे आमदार-खासदार, ज्यांची संख्या त्या गटातील असल्याचे सांगितले जाते, ते सर्व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. त्यामुळे आमदार आणि खासदारांची संख्या विचारात घेऊ नये, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला केली.

निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या या सुनावणीसाठी ठाकरे गटाकडून २३ लाख तर शिंदे गटाकडून ४ लाख कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्यावर खंडन करताना शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी त्यात कोणतीही त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच यापूर्वी झालेल्या काही सुनावणीचे प्रमाणपत्रही शिंदे गटाच्या वतीने देण्यात आले.