लातूरमध्ये एसटी पुलावरुन कोसळली:४२ प्रवासी जखमी

लातूर : लातूरमध्ये एसटी बस थेट पुलावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर, १४ जण गंभीर आहेत. जखमींवर मुरुड ग्रामीण रुग्णायात उपचार सुरू आहेत.

लातूरहून ही एसटी (MH 20 BL 2372) पुण्याच्या दिशेने निघाली होती. मात्र, ही बस मुरुडजवळ बोरगाव काळे येथे सकाळी आठच्या सुमारास आली असताना अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस थेट पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली. बसची समोरील बाजू मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली. यामुळे आतील प्रवाशांना हादरा बसला. चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून बसमधील ४२ प्रवासी जखमी झाले. यातील १४ जण गंभीर जखमी आहेत.

अपघात होताच बोरगाव काळे शिवारातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एसटीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. याचवेळी शेतकऱ्यांनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी झालेल्या १४ जणांना पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रवासी मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. तसेच, बसचेही मोठे नुकसान झाले आहे.लातुर-पुणे-वल्लभनगर ही एसटी निलंगा आगारातून निघाली. आज सकाळी ही बस पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मुरुड जवळील बोरगाव काळे येथील पुलावरून एसटी बस खाली उतरली. ही . बस जोरात आदळल्यामुळे आतमधील प्रवाशी जोरात आदळले गेले. याशिवाय, एसटी बसची पुढील काच पूर्णपणे फुटली आहे. बस पुलावरून खाली कोसळताच बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. तर प्रवासी गंभीर जखमी झाले. लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एसटीचा अपघात झाल्यानंतर प्रवाशी आतमधून बाहेर आले. अनेकांना दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील काही प्रवाशी शेजारीच पडून होते. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात नेमका कसा झाला?

या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरुन खाली उतरत मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. बसचा समोरचा भाग ढिगाऱ्यावर जोरात आदळल्याने चालकाला दुखापत झाली आहे. तर अन्य प्रवाशांनाही दुखापत झाली. या परिसरातील लोकांना अपघात झाल्याचे समजताच त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकेला बोलावून जखमींना तातडीने उपचारासाठी मुरूड रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्वपदावर आणली.

लातूर – मुरुड अकोला हा रस्ता खूपच अरुंद असून रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. शिवाय या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाचे काम होत नसल्याने या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे सरकारला अन् लातूरच्या राजकीय नेतृत्वाला कधी जाग येणार अन् या रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार, हा प्रश्न या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.