कोरोना संकटात शेतकर्‍यांनी क्षमता सिद्ध केली,’लेट द गेम बिगिन’, मोदींचा मंत्र

लोकल खेळण्यांसाठी ‘व्होकल’ होण्याची गरज-पंतप्रधान मोदी
Image may contain: 1 person, beard and text

नवी दिल्ली,30 ऑगस्ट 
कोरोनाच्या भीषण संकटात शेतकर्‍यांनी आपली क्षमता सिद्ध केली. देशात यंदा खरीप पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 7 टक्के वाढ झाली. यासाठी मी सर्व शेतकर्‍यांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केले. आतापर्यंत आपण चीन आणि इतर देशांच्या खेळण्यांवर अवलंबून होतो, पण आता या खेळण्यांचे देशातच उत्पादन करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान बोलत होते. सध्याचा काळ सण आणि उत्सवांचा आहे. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोना संकटात नागरिकांमध्ये उत्साह दिसत आहे. देशात होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमात संयम आणि साधेपणाचे दर्शन होत आहे आणि हे सर्व अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी गणेशोत्सव आभासी पद्धतीने साजरा केला जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षा जास्त आहे, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. या सात लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा अतिशय कमी आहे. मुलांच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा प्रभाव पडत असतो. याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करताना काळजी घेण्यात आली आहे. मी आपल्या स्टार्ट-अप मित्रांना, नवउद्योजकांना सांगू इच्छितो की, चला, सर्व मिळून खेळणी बनवू या! सर्वांसाठी लोकल-स्थानिक खेळण्यासाठी व्होकल होण्याचा हा काळ आहे, असे त्यांनी सांगितले.

खेळण्यांची 7 लाख कोटींची मोठी बाजारपेठ आहे. टॉय इंडस्ट्री अतिशय व्यापक आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीत भारताला पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. लोकल खेळणी वोकल करण्याचा प्रयत्न करुया. पर्यावरणालाही अनुकूल असतील अशी खेळणी तयार करावीत, खेळण्यांसह, मोबाईल, कॉम्प्युटर गेम्ससही भारतीय असावेत असं आवाहन मोदींनी केलं आहे. भारतीयांची इनोव्हेशनची क्षमता जगभरात लोकप्रिय आहे. भारतीयांच्या याच इनोव्हेशच्या जोरावर ‘लेट द गेम बिगिन’चा नवा मंत्र मोदींनी दिला आहे. स्टेप्स सेट गो, चिंगारी यांसारख्या काही भारतीय ऍप्सचं मोदींनी कौतुक केलं असून, भारतीय ऍप्स वापरण्याचं आवाहनही केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या आकाशवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. विविध विषयांबरोबरच त्यांनी या ताज्या कार्यक्रमामध्ये मुलांच्या खेळण्यांविषयी मनोगत व्यक्त केले. गांधीनगरची ‘चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि सूक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने मुलांसाठी चांगल्या दर्जाची खेळणी कशी बनविणे आवश्यक आहे, याविषयी काम केल्याचे सांगितले. खेळणी निर्मिती, उत्पादनामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकते, याच्याविषयी काम करीत असल्याचे सांगितले. मुलांच्या दृष्टीने खेळणी म्हणजे केवळ वेगवेगळ्या क्रियाकलापांचे साधन नाही, तर बालकांच्या आकांक्षांना पंख लावण्याचे काम खेळणी करतात. खेळण्यांमुळे मुलांचे केवळ मन रमते, मुलांचे मनोरंजन होते, असे नाही, तर खेळणी मुलांच्या मनाची निर्मिती करतात, त्यांना काही करण्याचा हेतू निर्माण करतात, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी मुलांच्या खेळण्याविषयी लिहून ठेवलेला किस्साही पंतप्रधानांनी यावेळी सांगितला. गुरूदेवांनी मुलांसाठी कोणते खेळणे चांगले, याविषयी नमूद केले आहे की, जे खेळणे अपूर्ण असते आणि जे खेळणे मुले सर्वजण मिळून खेळत-खेळत पूर्ण करतात, तेच खेळणे, तोच खेळ उत्कृष्ट असते. मुलांचे बालपण अनुभवताना त्यांच्यामधली सर्जनशीलता समोर आणणारे, खेळणे चांगले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मुलांच्या जीवनावर खेळण्यांचा विविध पैलूंमधून कसा परिणाम पडतो, याविषयी मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्यात आले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. देशाच्या विविध भागामध्ये अतिशय उत्तम खेळणी बनविणारे कुशल कलाकार आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी अनेक राज्यांमध्ये कुठे-कुठे खेळणी बनविणारे स्थानिक कलाकार आहेत, त्यांची माहिती दिली. याचे उदाहरण देताना त्यांनी कर्नाटकातल्या रामनगरम इथल्या चन्नापटना, आंध्र प्रदेशातल्या कृष्णामधील कोंडापल्ली, तामिळनाडूतल्या तंजावूर, आसाममधल्या धुबारी, उत्तर प्रदेशातल्या वाराणसी या शहरांमध्ये खेळणी निर्मितीची केंद्रे विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले. खेळण्यांच्या जागतिक बाजारपेठेत 7 लाख कोटींची उलाढाल होते, त्यामध्ये भारताचा सध्या अतिशय अल्प हिस्सा आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

विशाखापट्टणमचे  सी.व्ही. राजू यांनी स्थानिक कलाकारांच्या मदतीने उत्कृष्ट दर्जाचे  इटिकोप्पका खेळणे बनवले आहे, त्याबद्दल पंतप्रधानांनी राजू यांचे कौतुक केले. या परंपरागत स्थानिक खेळण्याला गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त झाली आहे. आता खेळणी निर्मिती क्षेत्रातल्या उद्योजकांनी एकत्र यावे आणि स्थानिक  खेळणी बनविणा-यांना वाव द्यावा, त्यांच्या खेळण्यांचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, ‘व्होकल फॉर लोकल’ व्हावे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

संगणकावर खेळण्याचे प्रमाण अलिकडे खूप वाढले आहे, असे नमूद करून त्यांनी आपल्या भारतीय ऐतिहासिक कल्पना आणि संकल्पनांवर आधारित  संगणकांचे खेळ बनविण्याचा सल्ला दिला.

प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करायचं असल्याचं मोदींनी सांगतिलं. आता सुरु झालेले छोटे-छोटे स्टार्टअपच पुढे जाऊन मोठ्या कंपन्या होणार आहेत. आताच्या मोठ्या कंपन्याही कधी-काळी स्टार्टअपचं होत्या, यासाठी सर्वांनी पुढे येऊन इनोव्हेट करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. 

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– जेव्हा तुम्ही भौतिक दूरता पाळाल, मुखाच्छादनाचा वापर कराल, तेव्हाच कोरोनापासून सुरक्षित राहाल. तुम्ही सर्व निरोगी राहा, आनंदी राहा, याच माझ्या शुभेच्छा.
– देश विकासाच्या दिशेने प्रवास करीत आहे. मात्र, या प्रवासात प्रत्येक नागरिक सहभागी होईल, तेव्हाच हा प्रवास यशस्वी होईल. या प्रवासात एक प्रवासी असेल, या मार्गावर एक वाटसरू असेल.

– देशात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र काहीतरी नवीन करीत आहेत. मला खात्री आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे देश मोठा बदल घडवून आणणार आहे आणि याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास शिक्षक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
– स्वातंत्र्यलढ्यात आपल्या देशातील ध्येयवादी नायक कोण होते, याचा परिचय आजच्या पिढीला, आपल्या विद्यार्थ्यांना असला पाहिजे, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे.
– पोषण या शब्दाच याचा अर्थ असा नाही की, आपण काय खात आहात, आपण किती खात आहात, किती वेळा खात आहात. याचा अर्थ आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे, हा आहे.
– सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल. राष्ट्र आणि पौष्टिकतेचे खूप चांगले नाते आहे. आपल्यात एक म्हण आहे – ‘यथा अन्नम्‌ तथा मन्नम्‌’ म्हणजे जसे आपले अन्न असते, त्याप्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *