2025 पर्यंत 660 जिल्हा कृषी हवामानशास्त्र केंद्र स्थापन करण्याचे आयएमडीचे उद्दिष्ट – डॉ. जितेंद्र सिंह

गेल्या पाच वर्षात खराब हवामानविषयक तीव्र घटनांसाठी हवामानाच्या भाकिताच्या अचूकतेमध्ये 20 ते 40% वाढ झाल्याची मंत्र्यांची माहिती

हवामानविषयक भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार

नवी दिल्ली,१५ जानेवारी / प्रतिनिधी:- हवामानविषयक घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

ते आज येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या(आयएमडी) 148 व्या स्थापना दिवस कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आयएमडीने सक्रिय पुढाकाराने पावले उचलत रडार नेटवर्कमध्ये वाढ करून त्यांची संख्या 2013 मधील 15 वरून 2023 मध्ये 37 केली आणि येत्या 2-3 वर्षात आणखी 25ची भर घालणार असल्याचे सांगायला अभिमान वाटत आहे, असे ते म्हणाले.    

डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या चार पश्चिम हिमालयन राज्यांसाठी 4 डॉप्लर रडारचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी 200 स्वयंचलित कृषी हवामान स्थानकांचे देखील राष्ट्रार्पण केले. आयएमडीची 8 प्रकाशने देखील त्यांनी प्रकाशित केली आणि शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले. आयएमडीची सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये आणि अधिकारी यांना देखील त्यांनी पुरस्कार प्रदान केले.

कृषी हवामानशास्त्रीय सेवांतर्गत 2025 पर्यंत 660 जिल्हा कृषी हवामानशास्त्रीय केंद्र(DAMUs) स्थापन करण्याचे आयएमडीचे उद्दिष्ट असल्याची आणि 2023 मधील 3100 तालुक्यांवरून 2025 मध्ये 7000 पर्यंत वाढ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

इशारा आणि सल्ला देणाऱ्या सेवांचा शेतकरी आणि मच्छिमारांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फायदा होत असल्याचे नॅशनल सेंटर फॉर ऍप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या एका ताज्या सर्वेक्षणात आढळले असल्याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.

शेतीच्या विविध टप्प्यांमध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांकडून जिल्हा आणि तालुका पातळ्यांवर कृषीहवामानविषयक सल्ल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना विशेषत्वाने त्यांना खूप जास्त प्रमाणात फायदे होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

अल्प आणि दीर्घकालीन नियोजनासाठी आणि धोरण विकासासाठी हवामान सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि आयएमडीने यापूर्वीच कृषी, आरोग्य, जल, ऊर्जा आणि आपत्ती जोखीम कपात या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये या सेवांचा वापर सुरू केला आहे आणि उत्पादनांमध्ये सोयीनुरुप केलेल्या बदलांच्या माध्यमातून त्यांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

आपले सकल देशांतर्गत उत्पादन अजूनही शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने मान्सून आणि चक्रीवादळांसह हवामानाचे अचूक भाकित करण्यासाठी आयएमडी सातत्याने सुधारणा करण्यावर भर देत असल्याबद्दल त्यांनी आयएमडीचे आभार मानले. कटिबंधीय चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, धुके, उष्णतेची लाट, थंडीची लाट, मेघगर्जनांसह पाऊस अतिजास्त खराब हवामानाची भाकिते करण्यामध्ये लक्षणीय सुधारणा होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या अन्नसुरक्षेची जीवनरेखा असलेल्या मान्सूनच्या भाकितामुळे केवळ आपल्या अर्थव्यवस्थेमध्येच सुधारणा होत नसून दक्षिण आशियायी भागात मान्सूनच्या काळात येणारे पूर आणि त्याच्या अभावी निर्माण होणारे दुष्काळ यामुळे जाणाऱ्या बळींची संख्या  कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गेल्या पाच वर्षात अतिजास्त खराब हवामानविषयक घटनांसाठी हवामानाच्या भाकिताच्या अचूकतेमध्ये 20 ते 40% वाढ झाल्याची बाब डॉ. जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांसमोर अधोरेखित केली. यावेळी हवामानाच्या भाकिताचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांवर भर देत जितेंद्र सिंह  म्हणाले की चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, गडगडाटासह पाऊस, उष्णतेची लाट आणि थंडीची लाट इ. अतितीव्र खराब हवामानाच्या घटनांच्या काळात जीवितहानी कमी करण्यात अचूक भाकिते आणि वेळेवर दिले जाणारे इशारे यामुळे यश आले आहे.