आरोग्यवर्धक आहार घेऊ, नियमित व्यायाम करू आणि तंदुरुस्त राहू: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर

नवी दिल्ली,१५ जानेवारी / प्रतिनिधी:-केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री  अनुराग सिंह ठाकूर यांनी रविवार, 15 जानेवारी रोजी फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तान अर्थात तंदुरुस्त भारत निरोगी हिंदुस्तान या चर्चात्मक मालिकेचा,भरड धान्यावर बेतलेल्या विशेष भागासह आरंभ केला.

मुख्य मालिकापूर्व कार्यक्रमाच्या विशेष भागात, अनुराग ठाकूर यांनी फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तान (तंदुरुस्त भारत निरोगी हिंदुस्तान) च्या मान्यवर तज्ञांसोबत एक विशेष सत्र घेतलं. यात त्यांनी तंदुरुस्ती, आरोग्यवर्धक आहाराचा तक्ता, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि आपल्या दैनंदिन जीवनात भरडधान्याचं महत्त्व याविषयी चर्चा केली.

प्रख्यात तंदुरुस्ती तज्ञ आणि फिट इंडिया उपक्रमाचे मान्यवर यांचा सहभाग असलेली ऑनलाइन चर्चासत्रं दाखवणारी ही मालिका, 22 जानेवारीला सुरु होऊन 12 मार्च 2023 पर्यंत सुरू राहील आणि दर रविवारी सकाळी 11 वाजता फिट इंडियाच्या अधिकृत यू ट्युब आणि इन्स्टाग्राम हँडलवर प्रसारीत होईल.

मुख्य मालिकापूर्व विशेष भागात, मंत्री महोदयांनी अशा चांगल्या उपक्रमाबद्दल फिट इंडियाच्या सर्व तज्ञ आणि मान्यवरांचं कौतुक केलं. ते म्हणाले, “वयाच्या 70 व्या वर्षी जर आपल्याला निरोगी शरीर हवं असेल तर, मग आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी लहानपणापासूनच का घेत नाही?  चला आपण, व्यावसायिक तज्ञांकडून माहिती घेऊ, आरोग्यवर्धक आहार घेऊ, नियमित व्यायाम करू आणि तंदुरुस्त राहू.  आपण लोकांना जागरुक करताच, खूप मोठा फरक पडणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा कार्यक्रम लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल.”

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक तंदुरुस्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी पाहिलेल्या स्वप्नानुसार, फिट इंडिया हेल्दी हिंदुस्थानचं उद्दिष्ट, सर्व वयोगटातील, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांमध्ये तंदुरुस्ती, आरोग्यवर्धक आहार आणि मानसिक स्वास्थ्य यांचे  महत्त्व वाढवणे, हा आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ (IYOM) म्हणून घोषित केलं आहे.  भारत सरकारनं यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे जगभरातील 70 हून अधिक देशांच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्रांचा हा ठराव स्वीकारला गेला आहे.  भारतीय भरड धान्य, पाककृती आणि मूल्यवर्धित उत्पादनं जागतिक स्तरावर स्वीकारली जावीत यासाठी भारत सरकार IYOM 2023 ला लोक चळवळ बनवण्याच्या दृष्टीनं हे वर्ष साजरं करण्याचा प्रयत्न करत आहे.

फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तानच्या पॅनेलवरील तज्ञांमध्ये ल्यूक कुटिन्हो (जीवनशैली तज्ञ), रायन फर्नांडो (क्रीडा पोषण आहार तज्ञ), हीना भिमाणी (पोषण आहार तज्ञ) आणि संग्राम सिंग (कुस्तीगीर/प्रेरक वक्ता) यांचा समावेश आहे.

भरडधान्याच्या महत्त्वाविषयी बोलताना, पोषण आहारतज्ञ रायन फर्नांडो म्हणाले, “60 % स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते, परंतु भरड धान्याच्या आहारातील समावेशामुळे ती कमतरता पूर्ण होऊ शकते. रागी या धान्यामध्ये फिनालिक  ऍसिड नावाचे आम्ल आहे. हे एक अतिशय शक्तिशाली महा अँटीऑक्सिडंट असून स्नायूंची हानी बरी करतं आणि माझ्या पुस्तकातील भरडधान्य नवीन महानायक बनणार आहेत”.

कुस्तीपटू संग्राम सिंह पुढे म्हणाले, “फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तान कार्यक्रम हा सरकारचा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. याचा सर्वांना फायदा होईल. आपण सर्वांनी भरडधान्याचा आहारात समावेश करायला  सुरुवात केली, तर व्याधी आपल्या देशापासून लांब राहतील आणि आपला देश लवकरच एक  क्रीडासत्ता बनेल.”