मुंबईत झळकले अंडरवर्ल्ड डॉनच्या वाढदिवसाचे बॅनर ; पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

मुंबई ,१४ जानेवारी  / प्रतिनिधी :- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मालाडमध्ये छोटा राजनच्या फोटोचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. अंडरवर्ल्ड डॉनच्या वाढदिवसाचे बॅनर झळकल्याने पोलिसांचाही गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हे बॅनर हटवले. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.


काल 13 जानेवारी रोजी छोटा राजनचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मालाड पूर्व गणेश मैदान तानाजी नगर, कुरार गाव येथे छोटा राजन च्या वाढदिवसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कबड्डी स्पर्धा आज शनिवार 14 आणि 15 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरात एक बॅनरही लावण्यात आला असून छोटा राजन हा आधारस्तंभ म्हणून दाखवण्यात आला आहे. हे बॅनर सीआर सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी लावले आहे.

पोस्टर व्हायरल झाल्यानंतर कुरार पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसांनी तात्काळ बॅनर हटवले. बॅनरमधील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित लोकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 2020 मध्येही छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी काही लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. या लोकांनी ठाण्यात दोन ठिकाणी बॅनर लावले होते. गेल्या वर्षी दुहेरी हत्याकांडातून छोटा राजनसह चौघांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. 2010 मध्ये छोटा शकील गँगच्या आसिफ दधी उर्फ छोटे मियाँ आणि शकील मोडक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनवर दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप होता.