नांदूर-मधमेश्वर कालव्यातून 20 दिवसांचे पाणी आवर्तन ; वैजापूर-गंगापूर तालुक्याला एक टीएमसी पाणी मिळणार

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :-वैजापूर व गंगापूर तालुक्‍यांसाठी रब्बी हंगाम व पिण्यासाठी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याव्दारे आवर्तन सोडण्यात आले. कालव्याव्दारे प्रारंभी 350 क्युसेकने सोडण्यात आलेला  विसर्ग नंतर 850 क्युसेकपर्यंत वाढविण्यात  आला असून साधारणतः 15 ते 20 दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. या आवर्तनातून दोन्हीही तालुक्यातील शेतकऱ्यांना एक टीएमसी पाणी मिळणार आहे.

 नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा फायदा रब्बी हंगामाच्या सिंचनासह पिण्यासाठी होणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून 10 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास 350 क्युसेक वेगाने विसर्ग कालव्यात सोडण्यात आला. त्यानंतर हा विसर्ग 850 क्युसेकपर्यंत करण्यात आला. नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी गंगापूर तालुक्यातील हद्दीत पोहोचले असून पायथा ते माथा या नियमानुसार पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाण्याचा लाभ वैजापूर तालुक्यातील 49 गावे व गंगापूर तालुक्यातील 46 गावे व कोपरगाव तालुक्यातील गावांना होतो. या पाण्यामुळे तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना सिंचनाचा फायदा होणार आहे. पाणी प्रथम गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून त्यानंतर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या या आवर्तनातून सुमारे एक टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बहुतांश जलसाठे  तुडुंब भरले आहेत. परंतु आता दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे दोन्ही तालुक्यांसाठी आवर्तन सोडणे गरजेचे होते. आवर्तन सोडल्याने दोन्हीही तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागणार  आहे.त्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात  आहे.

——————————

शेतकऱ्यांची मागणी वाढल्याने तातडीने नाशिक जलसंपदा विभागाकडे पाणी आवर्तनाची मागणी करण्यात आली. 15 ते 20 दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. पायथा ते माथा या नियमानुसार पाणी वाटप करण्यात येणार आहे. 

  – राकेश गुजरे, कार्यकारी अभियंता, नांमका, वैजापूर

———————