वैजापुरात पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते दानवे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक

वैजापूर ,१४ जानेवारी / प्रतिनिधी :- ठाकरे सेनेतून शिंदे गटाला समर्थन दिलेल्या येथील सर्व बंडखोर पदाधिका-यांची रिक्त पदावर नवीन शिवसैनिकांची नियुक्त करण्याची मोहीम विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हाती घेतली आहे.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख या नात्याने त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

सहा महिन्यापुर्वी शिवसेनेतील दुफळीमुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली.वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी शिवसेनेला समर्थन देण्याची भुमिका घेतल्यामुळे या मतदार संघातून नगरपालिकेतील 12 नगरसेवक, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह पक्ष संघटनेतील विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख आदी पदाधिका-यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे येथील ठाकरे सेनेचे पक्ष संघटन विस्कळीत झाले होते.पक्ष संघटनेची घडी नव्याने पुन्हा सुरळीत करण्यासाठी विरोधी पक्षनेते  दानवे यांनी शुक्रवारी वैजापूर दौरा केला.

या दौ-यात त्यांनी दिवंगत माजी आमदार आर. एम. वाणी यांच्या निवासस्थानी पक्षाचे प्रमुख पदाधिका-यांची विशेष बैठक घेतली.या बैठकीला सहसंपर्क प्रमुख अँड आसाराम रोठे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, तालुकाप्रमुख सचिन वाणी, माजी सभापती अविनाश गलांडे, प्रकाश चव्हाण, मनाजी मिसाळ, संजय निकम, मनोज गायके, आनंदीबाई अन्नदाते, विठ्ठल डमाळे यांची उपस्थिती होती.दानवे यांनी शिवसेनेचा विचाराला प्राधान्य देणा-या या मतदार संघात शिंदे सेनेचे अस्तित्व नाहीसे करण्यासाठी वैजापूर शहरासह आठ जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्ष संघटना बळकटीकरणासाठी प्रमुख पदाधिका-यांवर जबाबदारी सोपवून त्यांच्या कडून नियमितपणे कामकाजाचा आढावा घेण्यात येईल असे सांगितले. 

शिवसेनेत सक्रियेता दावा करणारे पदाधिकारी दूर करा

वैजापूर तालुक्यात काही पदाधिकारी ठाकरे सेनेत असल्याचा दिखावा करतात मात्र त्यांचे समर्थन शिंदे सेनेकडे अधिक आहे अशा दुटप्पी पदाधिका-यांची पक्षाला काही गरज नाही.त्यांची वेगळी यादी करुन त्यांच्या रिक्त पदावर नवीन पदाधिका-यांना काम करण्याची संधी देण्याची स्पष्ट सूचना पदाधिका-यांची बैठकीत दानवेनी दिल्या.