शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, १० ठार, २६ जखमी

मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची तर पंतप्रधानांची दोन लाखांची मदत

नाशिक,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळ आज पहाटे खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या अपघाताची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदी यांनी दोन लाख तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. आज पहाटे या बसची आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या बसमध्ये ठाणे उल्हासनगर परिसरातील ४५ प्रवासी प्रवास करत होते. येथील १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला.

दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात जात अपघातग्रस्तांची चौकशी केली. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अपघातातील मृतांची नावे

प्रमिला प्रकाश गोंधळी (वय ४५ वर्ष, रा. अबंरनाथ)
वैशाली नरेश उबाळे (वय ३२ वर्ष, रा. अबंरनाथ)
श्रावणी सुहास बारस्कर (वय ३० वर्ष, रा. अबंरनाथ)
श्रध्दा सुहास बारस्कर (वय ४ वर्ष, रा. अबंरनाथ)
नरेश मनोहर उबाळे (वय ३८ वर्ष, रा. अबंरनाथ)
बालाजी कृष्णा महंती (ड्रायव्हर) (वय २५ वर्ष)
दिक्षा संतोष गोंधळी (वय १८ वर्ष, रा. कल्याण)
चांदनी गच्छे
अंशुमन बाबू महंती, वय ७
रोशनी राजेश वाडेकर, वय ३६