वैजापूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव निकाली काढा – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधी व न्याय विभागाला सूचना

वैजापूर ,१३ जानेवारी / प्रतिनिधी :-विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (ता.13) वैजापूर दौऱ्यावर असतांना वैजापूर तालुका वकील संघास भेट देऊन वकिलांशी विविध विषयांवर चर्चा केली. गेल्या चार वर्षांपासून वैजापूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचा मुद्दा यावेळी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. दानवे यांनी तात्काळ विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांनी संपर्क साधून प्रलंबित असलेला वैजापूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या.

न्यायालयाच्या सध्याचा इमारतीमध्ये तीन प्रथमवर्ग न्यायालय, तीन दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) तसेच तीन जिल्हा तथा सत्र न्यायालय मार्फत कामकाज सुरू आहे. वरील न्यायालयाचे कामकाज बघता सध्याची इमारत ही कामकाजासाठी अपुरी पडत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मा. प्रधान, न्यायाधीश औरंगाबाद यांचे मार्फत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ मुंबई यांना 2018 साली वैजापूर जिल्हा न्यायालयासाठी नवीन इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. सदरचा प्रस्ताव न्याय व विधी शाखा मंत्रालय, मुंबई येथे प्रलंबित असल्याची माहिती वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिली. दानवे यांनी तात्काळ या समस्येची दखल घेत प्रधान सचिवांना संपर्क साधून तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जेष्ट विधीज्ञ अँड. आसाराम पाटील रोठे, वकील संघाचे अध्यक्ष अँड.किरण त्रिभुवन, उपाध्यक्ष अँड. व्ही.जी.वाघ, सचिव अँड. वैभव ढगे, अँड. प्रमोद जगताप,अँड.आर.डी.थोट, अँड.जे.डी. हरिदास, अँड.अनिल रोठे, अँड.प्रवीण साखरे, अँड.राफे हसन, अँड.सय्यद नुजहत, अँड. ज्योती शिंदे, अँड.संजय बत्तीसे, अँड.दत्तात्रय जाधव, अँड. कृष्णा गंडे यांच्यासह वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.