तांबे पितापुत्रावर होणार कारवाई-नाना पटोले

मुंबई ,१३ जानेवारी  / प्रतिनिधी :- नाशिक पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी काँग्रेसने ठरवलेल्या सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता त्यांनी सत्यजित तांबेंचा अर्ज भरला. विशेष म्हणजे अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काँग्रेस हाय कमांडचा आदेश झुगारल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली. यावरून आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “सुधीर तांबे यांनी पक्षाची फसवणूक केली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्ष हा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही,” असे स्पष्ट केले आहे. तसेच, काँग्रेस हाय कमांडला याबाबत सर्व माहिती दिली असून ते पुढील निर्णय घेतील, असेदेखील त्यांनी सांगितले.

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज दखल केला आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नाही. तसेच ते भाजपकडे पाठिंबा मागणार आहेत, असे ऐकले. मुळातच भाजप भीती दाखवून घरे फोडण्याचे काम करते. भाजप आज दुसऱ्यांची घरे फोडून आनंद घेत आहेत. पण ज्यादिवशी त्यांचे घर फुटेल, त्यादिवशी दुसऱ्यांची घरे फोडण्याचे दुःख काय असते? हे त्यांच्या लक्षात येईल.” पुढे ते म्हणाले की, “पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे कालपर्यंत माझ्या संपर्कात होते, मात्र आता ते संपर्कात नाहीत. काँग्रेस पक्षाला धोका देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.” असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.