अनुष्का शर्माची मुंबई उच्च न्यायालयात कर याचिका

मुंबई, दि. १३ जानेवारी/प्रतिनिधीः- चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने मुंबई उच्च न्यायालयात वाढीव कराची नोटीस मिळाल्याबद्दल धाव घेतली आहे. हा कर खूप जास्त असल्याचे तिचे म्हणणे आहे. न्यायालयाने शर्मा हिच्या याचिकेला उत्तर देण्यास महाराष्ट्र सरकारला गुरुवारी सांगितले आहे.

वर्ष २०१२-१३ आणि २०१३-१४ साठी विक्री कर उप आयुक्तांनी महाराष्ट्र व्हॅल्यू अडेड टॅक्स कायद्याखाली दिलेल्या दोन आदेशांना अनुष्का शर्मा हिने आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि अभय आहुजा यांच्या खंडपीठाने विक्रीकर विभागाला आव्हान याचिकेला उत्तर देण्यास सांगितले असून ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.

विक्रीकर विभागाने वर्ष २०१२-१३ मध्ये अनुष्का शर्मा हिला मिळालेल्या १२.३ कोटी रूपयांवर १.२ कोटी रूपयांचा विक्री कर (व्याजासह) आकारला आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये तिला मिळालेल्या १७ कोटी रूपयांवर १.६ कोटी रूपये कर आकारला आहे. तिने २०१२ आणि २०१६ दरम्यान चार याचिका दाखल केल्या होत्या.

मी जाहिरातींतून व पुरस्कार वितरण समारंभांचे संचालन करून स्वामित्वहक्क मिळवले व ते विकले किंवा हस्तांतरीत केले, असा चुकीचा समज अधिकाऱ्यांनी करून घेतला असा दावा याचिकेत शर्मा हिने केला.