नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून भरला फॉर्म

सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून गोंधळ,पिता-पुत्राच्या खेळीमुळे काँग्रेसची नाचक्की!

नाशिक,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसने ३ वेळा या मतदारसंघातून निवडून आलेले सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत आपल्या मुलाचा, सत्यजित तांबेचा अर्ज दाखल केला. तेही अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने सर्वांनाच धक्का बसला. यावर सत्यजित तांबे म्हणाले की, “मी काँग्रेसचाच उमेदवार आहे, पण शेवटपर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला.” असे मत त्यांनी व्यक्त केले.नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही सुधीर तांबे यांनी त्यांचा मुलगा सत्यजितसाठी अधिकृत उमेदवारी मागे घेतल्याने त्यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तांबे पिता-पुत्राच्या या खेळीमुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे.

सुधीर तांबे यांनी आत्तापर्यंत तीन वेळा काँग्रेसकडून निवडणूक लढवली आहे. यंदा ते चौथ्यांदा निवडणूक लढवणार होते. पण पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी वरिष्ठांना न कळवताच परस्पर अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. पक्षाला न विचारताच त्यांनी मुलासाठी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता तांबे यांच्यावर कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत. तरीही बाळासाहेब थोरात यांची इच्छा डावलून तांबे पिता-पुत्रांनी पक्षाला अंधारात ठेवले असे बोलले जात आहे.

सत्यजीत तांबे हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. २०१४ ला त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती, यात ते पराभूत झाले होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी त्यांच्यापुढील सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे मतदारसंघ. त्यांना स्वतःसाठी मतदारसंघ मिळत नव्हता. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात निवडून येतात, त्यामुळे ते जे उमेदवार देणार तोच निवडून येतो. त्यामुळे ही सगळी खेळी महत्वाची आहे. या खेळात तांबे पिता-पुत्रांनी बाळासाहेब थोरातांना अंधारात ठेवले, त्यामुळे काँग्रेसची जाहीर नाचक्की झालेली आहे.

यासंदर्भात सुधीर तांबे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “सत्यजित तांबे राज्यातील तरुण मुलांचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांच्यामध्ये एक दूरदृष्टी असलेले एक युवानेतृत्त्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये सखोल ज्ञान आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये हे नेतृत्व द्यावे, असा निर्णय आम्ही घेतला.” असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, “मला या निर्णयाबाबत काही माहिती नाही. या संदर्भातील सविस्तर माहिती घेऊनच प्रतिक्रिया देईन” असे त्यांनी सांगितले.

सत्यजित तांबे हे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “मी भाजपसोबत जाणार, अशी माहिती नेमकी कुठून मिळते? हे कळत नाही. अद्याप कुठल्याही भाजप नेत्यांना भेटलो नसून त्यांची माझ्यासोबत अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. यानंतर फक्त पाठिंब्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहे. बाकी इतर चर्चांवर मी विश्वास ठेवत नाही.” असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.