इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स राज्यातील महिला व बालविकास, पर्यटन, कौशल्य विकासासाठी सहकार्य करणार  – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई ,१२ जानेवारी  / प्रतिनिधी :- राज्यातील महिला व बालविकास क्षेत्रातील अंगणवाड्या व बालसुधारगृह यांचे बळकटीकरण, पर्यटनाला चालना देणे आणि कौशल्य विकास क्षेत्राला गती देण्यासाठी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात आज मूळ भारतीय वंशाचे कॅनडा स्थित नागरिक असलेले इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे शिष्टमंडळ ‘मिशन भारत’ उपक्रम अंतर्गत पर्यटन मंत्री श्री. लोढा यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद भारद्वाज, सदस्य राकेश जोशी, चिराग शहा, विरेंद्र राठी, राजेश शर्मा, दीपक शमाणी, अनिल शर्मा, चिन्मय चिक्रमने उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, महाराष्ट्र राज्यात पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाव आहे. समृद्ध समुद्र किनारे, उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, नैसर्गिक व ऐतिहासिक या पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक आणि आयटी क्षेत्रातही करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. हाच विचार घेऊन इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाशी पर्यटन विभाग नक्कीच पर्यटन वाढण्यासाठी सहकार्य करेल.

राज्यात महिला व बालविकासमध्ये अंगणवाड्या, बालसुधारगृहांना सुविधा पुरविणे, रोजगार वाढीसाठी कौशल्य विकास करण्यासाठी इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचे शिष्टमंडळाने सहकार्य करावे. या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून संपूर्णपणे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्री श्री.लोढा यांनी शिष्टमंडळाला दिली.

इंडो कॅनेडियन चेंबर कॉमर्सचे शिष्टमंडळ ‘मिशन भारत’ या उपक्रमाचे महत्त्व तसेच भारतातील वेगवेगळ्या भागात भारताच्या विकासासाठी प्रत्येक राज्यांना देण्यात येणाऱ्या भेटी याची माहिती श्री. भारद्वाज यांनी यावेळी दिली.