लक्षणे नसलेले कोरोना बाधित घरी राहून घेऊ शकतात उपचार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

औरंगाबाद,दि.31 – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे ज्या रुग्णांमध्ये सर्दी ,ताप व खोकला असे कोणतेच  लक्षणे आढळून आले नाहीत, परंतु त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशा रुग्णांना त्यांच्या घरी अलगिकरणाची सोय असल्यास  घरी राहून उपचार घेण्यासाठीची परवानगी मिळू शकते. हा पर्याय ऐच्छिक असून त्यासाठीची परवानगी   आरोग्य अधिकारी यांच्या द्वारा प्रमाणित  करून घेणे आवश्यक असल्याचे मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले.

        केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक  तत्वांनुसार ज्या  रुग्णांना लक्षणे आणि त्रास नाही मात्र कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे अशा रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या विलिनीकरणासाठीच्या सर्व सुविधा घरात  उपलब्ध असतील तर  रूग्णांची इच्छा असल्यास अशा रूग्णास घरात राहून उपचार घेण्याची परवानगी आरोग्य अधिकारी देऊ शकतात. या पद्धतीने उपचार घेत असलेल्या रूग्णाच्या तब्येतीतील सर्व तपशीलाची दैनंदिन माहिती वैद्यकीय पथकाला देणे, घरातल्या इतर व्यक्ती पासून सुरक्षित अंतर राखून नेमून दिलेल्या कालावधीपर्यंत स्वतंत्र खोलीत राहणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे, नियमितपणे  वैद्यकीय पथकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. आतापर्यंत   या पद्धतीने पाच रूग्णांवर घरी उपचार सुरू असून त्यापैकी एक रूग्ण बरा झाला आहे , असे  डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले.

        ज्या रुग्णांना जास्त त्रास असेल अशा रुग्णांना  उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच मनपातर्फे माझी हेल्थ माझ्या हाती या मोबाईल अॅपची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.या द्वारे कोरोना संशयित रुग्णांची माहिती  लवकर मिळणे आणि  रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करणे शक्य होणार आहे . त्यातुन  कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत होईल. तरी माझी हेल्थ माझ्या हाती हे अॅप जास्तीत जास्त नागरिकांनी डाऊनलोड करून घ्यावे.अॅक्सीमीटर, थर्मामीटर वर तपासणी करून आपल्या  शरीरातील ऑक्सिजन पातळी,ताप याची माहिती या अॅपवर टाकून आपण सुरक्षित आहोत की नाही याची माहिती मिळवावी, असे आवाहन महनगरपालिका औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *