अजित पवारांचा संजय शिरसाठ यांना मंत्रिपदावरून टोला:अनेक जण तर सुटबुट घालून तयार आहेत

औरंगाबाद,११ जानेवारी / प्रतिनिधी :-  शहराचे पाणी कुठे मुरतंय तेच कळत नाही. शिवसेनेचे महापौर व्यासपीठावर असताना अजित पवारांनी भाष्य केलं. पाण्याच्या समस्या आहेत. न्यायालयाने हस्तक्षेप करून देखील परिस्थिती सुधारत नाही. आम्ही प्रकल्प सुरू करत होतो, त्यावेळी 400 कोटीचा प्रकल्प आज 2800 कोटींवर गेला. कुठ पाणी मुरतंय कळत नाही. एवढे मंत्री मिळाले अजून मिळतील, अशी अपेक्षा आहे. अनेक जण तर सुटबुट घालून तयार आहेत. फोन आला की तयार राहायचं,या शब्दांत  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना खोचक टोला लगावला आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांच्याकडून आज अर्ज दाखल करण्यात आहे. दरम्यान अजित पवारांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र त्यापूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना पवारांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. औरंगाबाद शहराला 8 ते 15 दिवसांनी पाणी येते याचे आश्चर्य वाटते. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीसुद्धा पाणी मिळत नाही. आत्ताच्या मंत्रीमंडळात औरंगाबादला मोठ्याप्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले आहे. तर अजूनही मिळणार आहे. सगळेजणच सूट शिवून तयार बसले असून, कधी निरोप येतो याची वाट पाहत आहे. आता तीन मंत्रीपद मिळाले आहे. 20 लोकांमध्ये तीन मंत्रिपद फक्त एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले असल्याचं पवार म्हणाले. 

वाचाळवीरांना प्रत्येक पक्षाने आवरायला हवं –

राज्यात जे काही चाललं, वेगवेगळ्या बातम्या येतात. तेव्हा समाधानकारक स्थिती नाही, असं दिसतं. आता कोणाला काय बोलावं, कसे शब्द वापरले जातात, याचं भान राहील नाही. सर्वांनी आपल्या पक्षातील वाचाळवीर बोलत असतील तर त्यांनी नोंद घ्यावी. आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षात काळजी घेत आहोत. सर्वच पक्षांनी नोंद घ्यावी, पक्षांनी त्यांना समजून सांगावं, वेळ पडली तर कारवाई करावी. महत्वाचे मुद्दे बाजूला पडतात, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

अडीच वर्षे काही प्रश्न सुटले नाहीत, असं वाटत होतं. मात्र, कोरोनामुळे आर्थिक स्थिती खराब होती. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहेत. आता अडचणी आल्या नसत्या, मात्र सत्ता गेली, अशी खंत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बोलून दाखवली.

शहराच्या नामांतरावरून अजित पवार यांनी केली भूमिका स्पष्ट –

यांना निवडून दिलं याला दोष कोणाला द्यायचा. उमेदवाराला की मतदाराला हे कळत नाही. नावाच्या वादात न पडता काम करावं, कोणी म्हणत धर्मवीर संभाजी नाव द्या, तर कोणी काही म्हणत इतिहास इतिहासाच्या जागी आहे. नव्या पिढीला यात काही रस आहे, अस वाटत नाही. भारतीय म्हणून काम केलं तर चांगलं काम होईल.

राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार –अजितदादा पवार

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडींमध्ये सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व रणनीती ठरवण्यात आली, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात आहे. पुरोगामी विचार घेऊन आदरणीय शरद पवारसाहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हापासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी पुढे जात असतो. आमच्या पक्षात सर्व धर्मांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. घटना, कायदा, संविधानाला धरून देश आणि राज्य चालले पाहिजे या मताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. सत्ताधारी पक्षाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्याच्याशी आमचा दुरान्वये संबंध नाही. आम्ही आमच्या भूमिकेनेच पुढे जाणार आहे, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते. त्यातून त्रासून राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. वास्तविक चुका असतील मग माझ्या किंवा कुणाच्याही असोत त्याच्यावर कारवाई करावी. परंतु मुद्दाम कुभांड रचून कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे, कुणालातरी पुढे करुन गुन्हा दाखल करायला लावणे, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही असा निर्वाणीचा इशारा अजितदादांनी दिला.

महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळते आहे की, कशापद्धतीने विरोधकांना गोवण्यात येत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राज्यातील राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर होणार असेल तर आम्हालाही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल. असा अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडणार, आम्ही मूग गिळून बसलेलो नाही असेही अजितदादांनी ठणकावून सांगितले.

सभागृहात मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, तुम्ही तुमच्यासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांची घटना घडूनही स्पष्ट भूमिका घेत नाही. यावर समर्पक उत्तर दिले नाही. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरते आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख मिळत आहे. आपण न्यायालयाला विचारु शकतो का? त्यांना तो अधिकार आहे तो ते वापरत आहेत. मात्र गेले सहा महिने झाले तारीखच मिळत आहे असेही ते म्हणाले.

दरम्यान, मी उपटसुंभ लोकांच्या आरोपाला उत्तर द्यायला मोकळा नाही. किंवा उत्तर द्यायला बांधील नाही. त्यांचे डिपॉझिट जप्त करून पाठवले आहे. अशा शब्दात अजितदादांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाव न घेता पडळकर यांना टोला लगावला.