वैजापूर बाजार समितीच्या आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना

वैजापूर ,११ जानेवारी / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी आगामी काळात होणाऱ्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले असून त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.   

बाजार समितीत दीर्घकाळापासून संचालकपदाचा अनुभव असलेले भाजपाचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप यांच्या निवासस्थानी सोमवारी सायंकाळी त्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिनकर पवार, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मंजाहरी गाढे, डॉ. राजीव डोंगरे, कैलास पवार, अक्षय साठे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यपातळीवर शिंदे – भाजप गटाचे एकत्रीकरण झालेले आहे. मात्र स्थानिक राजकीय वर्तुळात भाजपातील काही पदाधिका-यांचा शिंदे सेनेशी समन्वयाचा संपर्क धागा जुळलेला नाही. शिंदे सेनेला अडचणीच्या खिंडीत गाठण्यासाठी हे पदाधिकारी संधीची वाट पाहून असतात. पुरणगाव येथील गोदावरी नदीवरील पूल मंजुरीचा श्रेयवाद दोन्ही गटात चांगलाच उफाळून आला होता. चिकटगावकरांचा ठाकरे सेनेसोबत घरोबा जुळून आल्यावर सहकार आघाडीचे नेते ज्ञानेश्वर जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी चिकटगावकरांना आमंत्रित करुन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमानंतर आगामी बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे सेना आणि भाजपा नेत्यात येथे चांगलीच साधकबाधक चर्चा झाल्याची माहिती मिळते. 

सहकारात पक्ष चिन्ह नसते – ज्ञानेश्वर पाटील जगताप  (भाजप)

माजी आमंदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासोबत बाजार समिती निवडणूकीत उतरलो होतो. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत त्यांनी मला मदतीची भुमिका बजावली होती. बाजार समितीच्या आगामी निवडणुकसंदर्भात आमच्यात चर्चासत्र घडून आले असून ही निवडणूक पक्ष चिन्हावर नसते असे विधान जगताप यांनी केले.