‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी होणार ठाकरे-शिंदे सत्तासंघर्षाची सुनावणी

नवी दिल्ली,​१०​ जानेवारी / प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण प्रलंबित आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या युक्तीवादानंतर या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता पुढच्या महिन्यात १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

आज सुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला. युक्तीवादादरम्यान सिब्बल यांनी मागच्या सुनावणी वेळी करण्यात आलेल्या युक्तीवादाचा दाखला दिला. गेल्या सुनावणीवेळी आम्ही नबाम राबिया खटल्याचा दाखला दिला होता. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर न्यावे, अशी विनंती केल्याची आठवणही सिब्बल यांनी खंडपीठाला करुन दिली. त्यानंतर न्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल आणि शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचे मत घेऊन ही सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेणार असल्याचे जाहीर केले.

ठाकरे गटाने हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्या, अशी मागणी केली आहे. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे, पीठासीन अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार आहे की, नाही हा या सगळ्या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे. २०१६ च्या अरुणाचल प्रदेशातल्या नबाम रेबिया केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या ५ न्यायमूर्तीच्या पीठाने महत्वाचा निकाल दिला आहे. अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही, असे या निकाल नमूद करण्यात आले होते. शिंदे गट याच निकालाचा आधार घेत, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही, असे म्हणत आहे. पण अरुणाचल आणि महाराष्ट्राच्या केसमधले संदर्भ वेगळी आहेत त्यामुळे या निकालाचा सरसकट अर्थ न काढता अधिक विश्लेषण करुन निकाला द्यावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

संजय राऊत माध्यमांसमोर म्हणाले की, “१४ फेब्रुवारी हा व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे. सगळे काही प्रेमाने होणार आहे. घटनेवर आमचं प्रेम आहे. १४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार असून हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.” तसेच, खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली की, “ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार की नाही? याबाबत आत्ता काही सांगता येणार नाही. पण, १४ फेब्रुवारीपासून याबाबत सलग सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होते की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.”