दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

मुंबई ,​९​ जानेवारी  / प्रतिनिधी :- दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक म्हणून ख्याती मिळवलेले डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी आज अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८४व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले असून त्यांनी २०हून अधिक पुस्तेके लिहिली आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनासाठी काहीकाळ काम केले होते.

डॉ. विश्वास मेहेंदळे हे दिल्ली आकाशवाणीवरुन पहिले मराठी बातम्या वाचणारे निवेदक ठरले. तसेच, ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदकही होते. त्यांनी मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच, अभिनयामध्येदेखील त्यांनी काम केले असून अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘मला भेटलेली माणसे’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम चांगलाच गाजला होता. त्याचदरम्यान, दूरदर्शनवर असलेला ‘वाद संवाद’ हा कार्यक्रम त्यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता. ‘यशवंतराव ते विलासराव’, ‘आपले पंतप्रधान’ यासारखे १८हून अधिक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले.

“माध्यम क्षेत्रातील अभ्यासू वाटाड्या हरपला”-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रवाहात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे, मार्गदर्शक असे वाटाड्या व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी माध्यमांच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांची शैलीही अनेकांना भावणारी अशी होती. त्यांनी माध्यमांच्या बदलत्या प्रवाहाच्या काळात स्वतः प्रयोगशील राहून नव्या पिढीला तंत्रज्ञान, सादरीकरण यातील अनेक पैलूंची ओळख करून दिली. त्यांचे हे कार्य सदैव प्रेरणादायी आणि स्मरणात राहील. त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसाठी वाटाड्या सारखेच होते. ज्येष्ठ माध्यमातज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

माध्यम क्षेत्रातील मार्गदर्शक हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यम विश्वातील एक मार्गदर्शक हरपला. आपले विचार संयतपणे मांडून त्यावर ठाम राहणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी लेखक, निवेदक आणि पत्रकार आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, विश्वास मेहेंदळे केवळ एक लेखक नव्हते. ‘पाच सरसंघचालक’ ‘यशवंतराव ते विलासराव’, ‘आपले पंतप्रधान’ ही त्यांची गाजलेली काही पुस्तके असली तरी पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक संस्था होते. संयतपणे आणि विचारांवर ठाम राहत निःपक्षपाती पत्रकारिता कशी करता येते, याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने शिकवण दिली. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.