वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची 13 जानेवारीला निवड

तारीख ठरताच सदस्यांची पळवापळवी

वैजापूर ,​८​ जानेवारी  / प्रतिनिधी :- तालुक्यात नुकत्याच 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये थेट लोकांमधून सरपंचांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुका संपल्यानंतर या नव्या ग्रामपंचायतींमध्ये आता उपसरपंचांची निवड 13 जानेवारीला होणार  आहे. दरम्यान, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच काही ठिकाणी सदस्यांची पळवा पळवी होऊन लॉबिंग सुरु झाली आहे.

सरपंच थेट जनतेतून निवडल्यानंतर आता उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक विभागाने  उपसरपंच पदाच्या निवडणुकीची तारीख जाहिर केल्याने उपसरपंचपदासाठी स्थानिक राजकीय नेते, आघाडी प्रमुखांकडून सदस्यांची पळवा पळवी सुरु झाल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच एका गटाचा तर सदस्य संख्येचे बहुमत दुसऱ्या गटाकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. सदस्यांमधूनच उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सदस्य संख्येचे गणित जुळवून आणण्यासाठी आघाडी प्रमुखांकडून व्यूहरचना आखली जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे नेते देखील आपला समर्थक, हितचिंतक उपसरपंच पदी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. विशेष करून उपसरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने काही ठिकाणी मोठा पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपसरपंच पदाचा पेच पॅनलप्रमुख कशा पद्धतीने सोडविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उपसरपंच निवडीसाठी 13 जानेवारीला 25 ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यांची सभा नेमून दिलेले अध्यासी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. त्यामुळे उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 25 ग्रामपंचायतीत होणार उपसरपंच निवड

तालुक्यात  जाहीर झालेल्या या 25 ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदाची निवड होणार आहे. महालगाव, पानवी बुद्रुक / वक्ती, अव्वलगाव / हमरापूर,  बाबतरा,  बेलगाव , भग्गाव, डागपिंपळगाव, गोळवाडी / मिरकनगर, हनुमंतगाव, हिंगणे कन्नड, हिलालपूर / कोरडगाव, कनकसागज, कविटखेडा /बिरोळा, कोल्ही , खरज / तितरखेडा, खिर्डी हरगोविंदपूर, माळीघोगरगाव, नादी, नांदूरढोक / बाभुळगावगंगा, पाराळा, पुरणगाव, रोटेगाव टुनकी, तिडी / मकरमतपूरवाडी, वांजरगाव