नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

मुंबई, दि. ७ जानेवारी/प्रतिनिधीः- राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर १३ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मलिक यांचे वकील तारेक सय्यद यांनी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला सांगितले की, मलिक यांच्या डाव्या मूत्रपिंडाची पूर्णपणे हानी झाली असून त्यांना चांगल्या उपचारांसाठी त्यांच्या जामीन अर्ज तातडीने सुनावणीस घेण्याची गरज आहे.

मलिक यांचा जामीन अर्ज हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली विशेष न्यायालयाने फेटाळल्यावर त्यांनी ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली. डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. न्यायमूर्ती कर्णिक १३ डिसेंबर रोजी म्हणाले होते की, “वैद्यकीय प्रश्नांवरून माझे समाधान झाले व उपचार उपलब्ध नसतील तरच मी दिलासा देईन. त्यानंतरच तातडीने सुनावणीचा प्रश्न मी गांभीर्याने घेईन.” तथापि, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) बाजू मांडताना मलिक हे आधीच मे २०२२ पासून त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात आहेत ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने अर्ज तातडीच्या सुनावणीच्या यादीत समाविष्ट करण्यास नकार दिला व ईडीला जामीन अर्जावर आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले.

अनिल सिंह यांनी शुक्रवारी जामीन अर्जाला विरोध करणारे उत्तर ईडी सादर करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने १३ जानेवारी रोजी जामीन अर्ज सुनावणीस घेण्याचे ठरवले.

नवाब मलिक यांना गुन्हेगारी जगताशी सलगी असल्याच्या आरोपावरून फेब्रुवारी २०२२ मध्ये ईडीने अटक केली होती. मुंबईच्या कुर्ला भागात मलिक यांनी कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर आणि त्याचे विश्वासू साथीदार सलीम पटेल आणि सरदार खान यांच्या मदतीने मालमत्ता बळकावली असा आरोप आहे.